शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

By आशपाक पठाण | Published: October 25, 2023 07:41 PM2023-10-25T19:41:38+5:302023-10-25T19:42:01+5:30

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

Farmers are in struggle; Cost per acre for soybeans is 17 thousand, income is 21 thousand | शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

लातूर : मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याची ओरड आहे. यंदा तर एकरी उत्पादन ४ ते ५ क्विंटल निघत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणी ते काढणीपर्यंत एकरी १७ हजारांचा खर्च झाला असून उत्पादन कुठे ४ तर कुठे ५ क्विंटल निघत असल्याने २० ते २३ हजार रुपये पदरी पडत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बीचा पेराही उसनवारी करण्याची वेळ आली आहे.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगाची वाढही झाली नाही. मध्यंतरी जवळपास एक महिना पावसाने ओढ दिल्याने माळरानावरील पिकांनी माना टाकल्या. फुलेही गळून पडली. त्यात आणखीन भर म्हणून पिकावर पडलेल्या येलो मोझॅक रोगाने वाटोळे केले. काही भागात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी साठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाभरात राशीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी तुमचा उतारा किती अन् भाव किती यावर चर्चा करीत आहे.

जेवढा खर्च तेवढेच उत्पन्न...
सोयाबीन बियाण्याची एक बॅग खरेदी केली ३ हजार रुपयाला खत, १२५० रुपयाच फवारणी खर्च ४ हजार रुपये, नांगरणी २ हजार रुपये, पेरणी १२०० रुपये, काढणी ३ हजार, मळणी १ हजार ७५० रुपये, वाहतूक ३५० रुपये, एकूण खर्च एकरी १७ हजार २५० रुपये आला. एकरी उतारा ५ क्विंटलचा निघाला असून बाजारात चांगला माल ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल गेला. डागी असेल तर ४ हजार दर मिळत आहे. आता रब्बीची पेरणी उसनवारीवर करायची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने पीक विम्याची अपेक्षा होती, याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. - नवनाथ शिंदे, शेतकरी, खुंटेफळ.

पामतेलाची आयात बंद करायला हवी...
देशात मागच्या दोन वर्षांपासून पामतेल आयातीचा ओघ सुरूच आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय. ऐन हंगामात हमी भावाच्या खाली सोयाबीनचे भाव आलेत. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या भावाचं गणित जुळत नाही. राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालेत. सरकार निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडायला लागलंय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, रामदास गिरी, गोरोबा मोदी, राजेंद्र मोरे, अशोक दहिफळे यांनी केला आहे.

२८ ऑक्टोबरला आंदोलनाची दिशा ठरणार...
आता शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारावे लागतील. अन्यथा आपल्या शेतमालाचे भाव मातीमोल केल्याशिवाय सरकार थांबणार नाही. म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर २८ ऑक्टोबर लातूरला येत आहे. शासकीय विश्रामगृहात ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.

Web Title: Farmers are in struggle; Cost per acre for soybeans is 17 thousand, income is 21 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.