शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार
By हणमंत गायकवाड | Published: March 13, 2023 06:24 PM2023-03-13T18:24:52+5:302023-03-13T18:25:53+5:30
उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार
लातूर : मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत १२६.४२९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, यातील ६७ दलघमी पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे. यातून ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र उन्हाळ्यात भिजणार आहे. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून ५४ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले जाणार असून, यातून ६४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली राहील, तर उन्हाळी हंगाम जलाशय पाणीवापर १३ दलघमी नियोजित आहे. त्यातून दोन हजार ६०० हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. एकूण ९ हजार ८० हेक्टर क्षेत्राला या हंगामात मांजरा प्रकल्पातून पाणी मिळणार आहे.
१ मार्च २०२३ ते ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत उन्हाळी हंगाम राहणार आहे. या चार महिन्याच्या हंगामात मांजरा प्रकल्पातून तीन वेळा पाणी सोडले जाणार आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाईल. या हंगामात केवळ कालव्याच्या पाण्यावर विसंबून न राहता विहीर तसेच बोरच्या आधारावर जास्त पाण्याची पिके घ्यावीत. कमी पाणी लागणाऱ्या पिकांसाठी प्रकल्पाच्या पाण्याचा आधार घ्यावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
२९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन...
मांजरा प्रकल्पात एकूण १२६.४२९ दलघमी पाणीसाठ्यापैकी या उन्हाळ्यात २९ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असा अंदाज धरण व्यवस्थापनाचा आहे.
सिंचनाव्यतिरिक्त ४१ दलघमी पाणीवापर
सिंचनासाठी एकूण ६७ पाणी वापरले जाणार आहे, तर सिंचनाव्यतिरिक्त पिण्यासाठी आणि व अन्य कामांसाठी ४१ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. मांजरा प्रकल्पामध्ये उन्हाळी हंगामासाठी ८५.४२९ पाणीसाठा उपलब्ध आहे.
गाळामुळे १६.२२७ दलघमी पाणी साठवण क्षमतेत घट...
गाळ सर्वेक्षण अहवालानुसार गाळामुळे साठवण क्षमतेत घट झालेली आहे. १६.२२७ दलघमी पाणी साठवण क्षमतेत घट आहे. बाष्पीभवनामुळे २९ आणि गाळामुळे १६.२२७ असे एकूण ४५.२२७ दलघमी पाणी कमी होणार आहे.
मांजरा प्रकल्पातील पाणी वापराचे असे आहे नियोजन...
उपयुक्त पाणीसाठा : १२६.४२९ दलघमी
गाळामुळे साठवण क्षमतेत घट : १६.२२७ दलघमी
बाष्पीभवन : २९.०० दलघमी
बिगरसिंचन पाणीवापर : १२ दलघमी
एकूण सिंचनाव्यतिरिक्त पाणीवापर : ४१.०० दलघमी
उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा : ८५.२२९
उन्हाळी हंगाम जलाशय पाणीवापर : १३ दलघमी
उन्हाळी हंगाम कालवा पाणीवापर : ५४ दलघमी
उन्हाळी हंगाम पाणी पाळी संख्या : ०३
उन्हाळी हंगाम एकूण पाणीवापर : ६७ दलघमी