सकाळी धुक्यांची चादर, हरभऱ्यावर घाटेअळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त
By हरी मोकाशे | Published: December 8, 2023 06:25 PM2023-12-08T18:25:13+5:302023-12-08T18:25:54+5:30
सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे.
लातूर : आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. पर्यंत तर सर्वत्र धुके पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, किमान तापमानात मोठी घट होऊन १०.७ अं. से. असे नोंदले गेले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटेअळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्याचे रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टर असा आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर तर गव्हाचा ८ हजार ५९३ हेक्टरवर झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मिचाँग चक्रीवादळ आल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. जवळपास आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊसही झाला. शुक्रवारी सकाळी धुके पडले होते. त्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यामुळे हवेतील थंडी कमी झाली असली तरी किमान तापमान १०.७ अं.से. असल्याचे येथील गळीत धान्य संशोधन केंद्रात नोंदले गेले आहे.
शुक्रवारी सर्वात कमी तापमान...
दिनांक - किमान - कमाल तापमान
१ डिसेंबर - १५.९ - २५.५
२ डिसेंबर - २० - २५.८
३ डिसेंबर - १५.५ - २५
४ डिसेंबर - २०.१ - २५.४
५ डिसेंबर - १५.१ - २५
६ डिसेंबर - १५.४ - २०.४
७ डिसेंबर - १५.३ - २०.५
८ डिसेंबर - १०.७ - २५.२
हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या आळ्या...
काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्याचा परिणाम हरभरा आणि ज्वारीच्या पिकावर झाला आहे. सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या अळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच ज्वारीवरही अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
अळीच्या नियंत्रणासाठी या औषधांची करा फवारणी...
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टिन बेंझोएट ५ टक्के, एससी ४ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्वारीवरील पोंगा मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायमेथॉक्सम (१२.५ टक्के) आणि लिंबडॅसालॉट्रीन (९.५) झिंकचा वापर करावा. कृषी विभागाचा सल्ला घेऊन औषधांची फवारणी करावी.
- दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी.