शेतकऱ्यांनो बियाणे, खतांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार!

By हरी मोकाशे | Published: May 21, 2024 06:36 PM2024-05-21T18:36:54+5:302024-05-21T18:37:26+5:30

कृषी विभागाकडून खरीप हंगामात जिल्हा, तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष

Farmers, if you have doubts about the quality of seeds and fertilizers, complain without hesitation! | शेतकऱ्यांनो बियाणे, खतांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार!

शेतकऱ्यांनो बियाणे, खतांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार!

लातूर : खरिपासाठी बियाणे, खते, कीटकनाशकांसह कृषी निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाबाबत काही शंका आल्यास थेट तक्रार करता येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर दहा असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

खरिपासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषी निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषी निविष्ठांची तपासणी करण्यात येते. त्यानंतरही शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात हंगाम संपेपर्यंत दर्जा व गुणवत्ता आदींबाबत संशय आल्यास अथवा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करता येते. त्यासाठी एकूण ११ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत तक्रार नोंदविताना संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकांकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रारीबरोबर खरेदी पावती, ७/१२, होल्डिंग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. तसेच तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

कृषि निविष्ठा खरेदी करताना घ्या काळजी
गुणवत्ता व दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी. त्यात बियाण्याची जात, लॉट नंबर, उत्पादक दिनांक आदी मजकूर असल्याची खात्री करावी. खताच्या किमतीत कोणत्याही प्रकरची वाढ झाली नसून चढ्या भावाने विक्री केल्यास विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जाधव व कृषी विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.

Web Title: Farmers, if you have doubts about the quality of seeds and fertilizers, complain without hesitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.