शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

By संदीप शिंदे | Published: January 13, 2024 12:06 PM2024-01-13T12:06:45+5:302024-01-13T12:14:31+5:30

कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Farmers in crisis! Farm pump power cut, standing sugarcane drying up; But factories will not take sugarcane | शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

- व्ही. एस. कुलकर्णी

उदगीर (जि. लातूर) : पिण्याच्या पाण्यासाठी देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या ग्रीन बेल्टमध्ये सुरू असलेल्या शेतीपंपांची वीज खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस वाळून जात आहे. अशातच साखर कारखान्याकडून या उसाची तोड करून गाळपासाठी नेला जात नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ग्रीन बेल्ट परिसरातील सरपंच व शेतकऱ्यांनी या उसाची तत्काळ विल्हेवाट लावण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाकडे निवेदन देऊनही कारखाना प्रशासनाने ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली आहे.

देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या चिघळी, भाकसखेडा, देवर्जन, हणमंतवाडी, धोतरवाडी,गंगापूर परिसराच्या ग्रीन बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे महसूल प्रशासनाने देवर्जन मध्यम प्रकल्पातील सद्य:स्थितीत असलेला पाण्याचा साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडीची तारीख जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यातील आहे. या तारखेशिवाय ऊस तोडला जाणार नाही. अशी कारखाना प्रशासनाची भूमिका आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी या ग्रीन बेल्टमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस वाळून जात आहे. दरम्यान, आजघडीला साखर कारखान्याच्या गावात एक-दोन टोळ्या ऊसतोडणीसाठी कार्यरत आहेत. किमान तीन साखर कारखान्यांच्या दहा -पंधरा टोळ्या ऊसतोडणीसाठी ठेवण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मागणी करूनही ऊसतोड होत नाही
महसूल प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी शेतीपंपांचे कनेक्शन तोडल्यानंतर देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर व शेतकऱ्यांनी कारखान्यांकडे ग्रीन बेल्टमधील ऊस गाळपासाठी नेण्याची मागणी केली. शिवाय उदगीरच्या तहसीलदारांनी कारखाना प्रशासनास ग्रीन बेल्टमधील शेतीपंपांची वीज खंडित करण्यात आल्यामुळे उभ्या उसाची तोड तारीख लांबणीवर असली तरी या उसाची तत्काळ तोड करण्यात यावी, असे पत्र देऊनही कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांचे क्रीडामंत्र्यांना साकडे
शेतात वाळून जात असलेल्या उसाची साखर कारखान्याकडून तत्काळ तोड करण्यात यावी, अन्यथा वीजपंपांचे तोडण्यात आलेले कनेक्शन तत्काळ जोडून देण्यात यावे, अशी मागणी देवर्जन परिसरातील गंगापूरचे शेतकरी नागभूषण बिरादार व शांतकुमार बिरादार यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. त्यानुसार याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

नवीन शेअर्स न घेता सभासदत्व द्यावे
देवर्जन परिसरातील शेतकरी तीन साखर कारखान्यांचे सभासद आहेत. तोंडारचा प्रियदर्शनी नाव असताना या ग्रीन बेल्टमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याचे सभासद होते. मात्र, हा साखर कारखाना विकास -२ खासगी झाल्यानंतर १५ ते २० टक्केच शेतकरी पुन्हा शेअर्स खरेदी करून सभासद झाले आहेत. प्रियदर्शनीचे सर्व सभासद शेतकऱ्यांना नवीन शेअर्स न घेता सरसकट शेतकऱ्यांना सभासद म्हणून मान्यता देऊन या सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी प्राध्यान्याने नेण्याची मागणी ग्रीन बेल्टमधील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Farmers in crisis! Farm pump power cut, standing sugarcane drying up; But factories will not take sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.