हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By संदीप शिंदे | Updated: January 28, 2025 17:59 IST2025-01-28T17:58:26+5:302025-01-28T17:59:30+5:30
५४ हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
लातूर : हमीभावाने सोयाबीन खरेदीस केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना जिल्ह्यातील खरेदीचे उद्दिष्ट सोमवारी रात्री पूर्ण झाल्याने मंगळवारपासून वजनकाटे स्थिरावले आहेत, तर मापतोल थांबले आहे. त्यामुळे शेतकरी अन् केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची झोपच उडाली आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी १०० ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर आले असून, बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटनेचा या आंदोलनात सहभाग आहे. जिल्ह्यातील ५४ हमीभाव खरेदी केंद्राची मुदत वाढविण्यात यावी, नाेंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, हजारो वाहनांच्या ५४ हमीभाव खरेदी केंद्रांसमोर रांगा लागल्या असून, खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी आहे.