पीकविमा भरण्यासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:15 AM2021-07-16T04:15:20+5:302021-07-16T04:15:20+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. परंतु, शंभर टक्के पेरण्या झाल्या नसल्याने पीकविमा कसा भरायचा असा प्रश्न काही ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. परंतु, शंभर टक्के पेरण्या झाल्या नसल्याने पीकविमा कसा भरायचा असा प्रश्न काही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरण्या उरकून शेवटच्या दिवशी पीकविमा भरण्यासाठी बँकेचा रस्ता धरला होता. तालुक्यात जिल्हा बँकेच्या आठ शाखा आहेत. बँकेसह महा-ई- सेवा केंद्रावर रांगा लागल्या होत्या. पीकविमा भरण्यासाठी ७/१२, ८ अ, पीकपेरा, बँक पासबुक आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना काही जणांची तारांबळ उडाली होती. शेवटच्या दिवशी पेरण्या करून आर्थिक अडचणीत असलेल्यांनी पीकविम्यासाठी व्याजी, उसनवारी करावी लागली. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश गुडे, विलास पाटील, भरत पेंटमशेटे, साहेबराव भंडारे, बद्रीनाथ सांगवे, बब्रुवान काळे, गंगाधर बिरादार, हरिश्चंद्र बिरादार, शहाजीराव सुरवसे, कुमार बिरादार यांनी केली आहे.
दैठणा बँकेत ८०० जणांनी भरला विमा...
तालुक्यातील दैठणा, शेंद येथील शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक जाधव म्हणाले, दैठणा आणि शेंद येथील ८०० शेतकऱ्यांनी विमा भरला असून, ऑनलाइनवरून जवळपास १०० शेतकऱ्यांनी विमा भरला असावा, असा अंदाज व्यक्त केला.