अंत्यविधीला शेतकऱ्यांचा विराेध; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या, स्मशानभूमीसाठी पार्थिव ६ तास रस्त्यावरच
By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 02:52 IST2025-02-10T02:51:47+5:302025-02-10T02:52:22+5:30
तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

प्रतिकात्मक फोटो
रेणापूर (जि. लातूर) : अंत्यसंस्कारासाठी धवेली येथील शेतकऱ्यांनी विराेध केल्याने रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने पार्थिव सहा तास रस्त्यावर ठेवत संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडला. तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
धवेली गावची लोकसंख्या चार हजारांवर असून, गावात मातंग समाजाची लोकसंख्या दाेन हजारांच्या घरात आहे. मातंग समाज सोडला तर इतर समाजाला शेती असल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, मातंग समाजाला शेती नसल्याने धवेली-जानवळ रस्त्यालगत शेतातील मसनवाटा आशी शासकीय दफ्तरी नोंद आहे. मात्र, येथे स्मशानभूमीचा वाद गत अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्मशानभूमीची जागा नियोजीत असून, गत तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत आहे. दरम्यान, संभाजी पांडुरंग शिंदे (वय ४०) यांचा शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी रविवारी सकाळी सरण रचण्यासाठी लाकडे टाकली हाेती. याला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केला. ऐनवेळी विराेध करण्यात आल्याने अंत्यसंस्कार काेठे करायाचा? असा प्रश्न निर्माण झाला. संतप्त नातेवाईंनी अखेर धवेली-जानवळ रस्त्यावर तब्बल सहा तास पार्थिव ठेवत ठिय्या मांडला.
या घटनेची माहिती रेणापूर तहसिलदार मंजुषा भगत, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांना मिळाली. त्यांनी प्रशासनाच्यावतीने मध्यस्थी केली. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वर्षानवर्षांपासून मातंग समाज धवेली-जानवळ रस्त्यालगत असलेल्या शेतातच अंत्यसंस्कार करतात. ही प्रथा आजही कायम आहे.