शेतकऱ्यांची घरगुती बियाणांवर मदार; खरीपाच्या खर्चात बचत
By हरी मोकाशे | Published: June 12, 2024 07:56 PM2024-06-12T19:56:36+5:302024-06-12T19:58:27+5:30
लातूर जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा होण्याचा अंदाज
लातूर : शेती पिकांसाठीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची आर्थिक बचत व्हावी. तसेच शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर करावा म्हणून म्हणून कृषी विभागाच्या वतीने सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची घरगुती बियाणांवर मदार आहे. यंदाच्या खरीपासाठी ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे आवश्यक आहे. त्यापैकी १४ हजार ५९६ शेतकऱ्यांकडे ४ लाख ६१ हजार २४० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. शिवाय, शासनामार्फत १ लाख ३२ हजार ६४३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.
जिल्ह्यात खरीपाचे ६ लाख १ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. तुरीचा ७५ हजार, मुग ६ हजार ५००, उडीद- ४ हजार ५००, ज्वारीचा १० हजार हेक्टरवर पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
४ लाख ६१ हजार क्विंटल बियाणे बळीराजाकडे...
तालुका - बियाणे (क्विं.)
लातूर - ७५,५६९
उदगीर - ३५,१५०
अहमदपूर - ४०,२४१
जळकोट - १५,६००
देवणी - २३,४५०
शिरुर अनं. - १५,६५३
औसा - ८०,३४०
निलंगा - ७०,०६०
रेणापूर - ५१,१४१
चाकूर - ५४,३३६
एकूण - ४,६१,२४०
प्रस्तावित क्षेत्र - ४,९०,९०० हेक्टर
आवश्यक बियाणे - ३,६७,५०० क्विंटल
शेतकऱ्यांकडे उपलब्ध - ४,६१,२४० क्विंटल
बियाणे बदल आवश्यक - १,२८,६२५ क्विंटल
मुबलक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध...
यंदाच्या खरीप हंगामात कुठल्याही बी- बियाणे, खतांचा तुटवडा नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात बियाणे, खते उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये. घरगुती बियाणांचा अधिकाधिक वापर करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी, असे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी सांगितले.
विशिष्ठ वाण, खताचा आग्रह धरु नका...
जिल्ह्यास आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात बी- बियाणे, खते उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठलीही कमतरता भासणार नाही. मात्र, शेतकऱ्यांनी विशिष्ठ बियाणाचे वाण, ठराविक कंपनीच्या खताचा आग्रह धरु नये. त्यामुळे नाहक गर्दी होण्याची शक्यता असते.
- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.
कंपन्यांचे ८२ हजार क्विं. बियाणे शिल्लक...
खरीपासाठी विविध कंपन्यांच्या १ लाख २८ हजार ६२५ क्विंटल सोयाबीनच्या बियाणांची मागणी करण्यात आली होती. त्यापोटी १ लाख ३२ हजार ६४३ क्विंटल उपलब्धता झाली आहे. आतापर्यंत ५० हजार २६० क्विंटल बियाणांची विक्री झाली असून सध्या ८२ हजार ३८३ क्विंटल बी शिल्लक आहे.