४३ महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम

By हरी मोकाशे | Published: November 10, 2023 09:15 PM2023-11-10T21:15:09+5:302023-11-10T21:15:13+5:30

दिवाळी होणार आनंदात : विभागस्तरीय समितीचे निर्देश

Farmers with crop insurance in 43 revenue boards will get 25 percent advance | ४३ महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम

४३ महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम

लातूर : खरिपात पावसाने ताण दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट होऊनही पीकविमा कंपनीकडून २५ टक्के अग्रीम देण्यास टाळाटाळ होत होती. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. तेव्हा विभागीय आयुक्तांनी ४३ महसूल मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के अग्रीम तत्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ६० महसूल मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश पीकविमा कंपनीस दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतले होते.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्रधानमंत्री पीकविमा योजना विभागस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीस विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक अशा एकूण १२ जणांची उपस्थिती होती. या बैठकीत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना अग्रीम देण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. तेव्हा विभागीय आयुक्तांनी उर्वरित १७ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांचा खंड नव्हता का अशी विचारणा केली आणि सर्वच महसूल मंडळांना २५ टक्के अग्रीम देण्याचे निर्देश दिले. तेव्हा विमा कंपनीने १७ महसूल मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली आहे.

अग्रीम तत्काळ वाटप करा...
जिल्ह्यातील ६० पैकी ४३ महसूल मंडळांतील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम तत्काळ वितरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पीकविमा कंपनीस दिले आहेत. उर्वरित १७ महसूल मंडळांचे १७ नोव्हेंबरपर्यंत पुनर्मूल्यांकन करावे आणि त्यांनाही २५ टक्के अग्रीम रक्कम वितरित करावी, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

Web Title: Farmers with crop insurance in 43 revenue boards will get 25 percent advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.