उदगीर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर; खरिपाच्या पिकांना धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:19+5:302021-07-07T04:25:19+5:30
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीसुध्दा मान्सूनने जून महिन्यातच चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शहरासह तालुक्यात ११ जून, ...
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीसुध्दा मान्सूनने जून महिन्यातच चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शहरासह तालुक्यात ११ जून, १३ व १४ जून अशी तीन दिवस पावसाने जोरदार सलामी दिली. कृषी विभागाने १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास पेरण्या करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला होता. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवामान अंदाज पूर्णत; खरा ठरणार असल्याचे चित्र दिसत होते. यंदा पेरणीवेळी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाणांसाठी फार मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना तर महाबीज कंपनीचे बियाणे व डीएपी खतच मिळाले नाही. त्यामुळे मिळेल ते खत व दुकानदार देतील ते बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी उरकली.
तालुक्याचे ६६ हजार हेक्टर खरिपाचे पेरणीयोग्य क्षेत्र...
यंदा सोयाबीनला बाजारात मिळत असलेला विक्रमी दर पाहता, शेतकऱ्यांनी सर्वात जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. त्या खालोखाल तूर, मूग, ज्वारी, उडिदाची लागण केली आहे. उदगीर, नळगीर, मोघाया तीन मंडलांत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद असून, तोंडार, देवर्जन, नागलगाव, हेर, वाढवणा मंडलांंत २०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडल्याची नोंद आहे. काही भागात पेरण्या होऊन २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मागील आठ दिवसांपासून तालुक्यात उन्हाळ्यासारखा कडक उन्हाचा चटका बसत असल्याने जमिनीतील ओल वेगाने कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकाला पाणी देत आहेत.
उदगीर मंडलात सर्वाधिक पाऊस...
येत्या चार दिवसांत पाऊस न पडल्यास पिके दुपार धरू लागतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग दाटले असून, बळीराजासह सर्वांनीच आकाशाकडे नजरा लावल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत मंडलनिहाय पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे उदगीर ४०६, मिलिमीटर, नागलगाव २९३, मोघा ३७४, हेर २०४, वाढवणा २३८, नळगीर ३८२, देवर्जन २७८, तोंडार २०२ इतक्या पावसाची नोंद झाली असून, तालुक्यात सरासरी एकूण २९७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे.