श्रावणात उपवास महागला, शेंगदाणे, भगरीच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:16+5:302021-09-02T04:43:16+5:30
अहमदपूर : किराणा बाजारात फारशी तेजी- मंदी झाली नसली, तरी हळुवारपणे काही वस्तू, धान्य महागले आहे. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या ...
अहमदपूर : किराणा बाजारात फारशी तेजी- मंदी झाली नसली, तरी हळुवारपणे काही वस्तू, धान्य महागले आहे. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. मात्र, यंदा शेंगदाणे, भगर, नाॅयलान साबुदाणाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा ग्राहकांना अल्पसा फटका बसत आहे. उपवासामुळे ग्राहकही नाइलाजास्तव खरेदी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
किराणा किरकोळ बाजारात महिनाभरापूर्वी शेंगदाण्याचे दर १०० रुपये प्रति किलो होते. सध्या यात किलोमागे १० रुपयांची वाढ होऊन ११० रुपये किलो झाले आहेत. भगर ९० रुपये किलो होती. त्यातही १० रुपयांची वाढ होऊन १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. नायलॉन साबुदाण्याचे दर ८० रुपये किलो होते. त्यातही १० रुपयांनी वाढ झाली आहे. श्रावण महिन्यात बाजारात साबुदाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन मागणीही अधिक असल्याने विक्री होते. साबुदाण्याचे दर स्थिर असून ५५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
तालुक्यातील मोजक्या भागात भुईमुगाचे पीक घेतले जाते. सध्या बाजारात अद्याप भुईमूग आला नाही. त्यामुळे शेंगदाण्याचे दर वाढलेले पाहावयास मिळत आहेत. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे उपवासामुळे शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे. बाजारात येणारा साबुदाणा राज्यातून कमी आणि परराज्यातून अधिक मोठ्या प्रमाणात येतो. सध्या साबुदाण्याची आवक घटली आहे.
साबुदाण्याचे दर स्थिर...
श्रावणमासापूर्वी आणि आताही साबुदाण्याचे दर स्थिर आहेत. ५५ रुपये किलोने विक्री होत आहे. सध्या दर जरी स्थिर असले तरी आगामी काळात मागणी वाढल्यास दरही वाढू शकतात, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
मागणी दुप्पट वाढली...
बाजारात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे या पदार्थांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. त्यामुळे महागाई जाणवत आहे, असे किराणा व्यापारी राजकुमार तत्तापुरे यांनी सांगितले.
सध्या घुंगरू शेंगदाणे ८० ते ९०, गावरान शेंगदाणे ९० ते १००, चांगली भगर ९० ते १००, साधी भगर ७० ते ८०, नायलॉन साबुदाणा ८० ते ९०, राजगिरा लाडू १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.