दीडशे रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; कत्तीचे वार, बेदम मारहाणीत एकजण गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Published: October 14, 2022 08:31 PM2022-10-14T20:31:34+5:302022-10-14T20:33:58+5:30
उसने घेतलेले दीडशे रुपये दे म्हणून भांडणाची कुरापत काढली आणि लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
किल्लारी (जि. लातूर) : उसणे दिलेले दीडशे रुपये परत दे म्हणून औसा तालुक्यातील उत्का येथील एकाने धारदार कत्तीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री ७.३० वा. च्या सुमारास उत्का येथील समाज मंदिरासमोर फिर्यादी विवेकानंद वामन शिंदे हे उभे होते. तेव्हा आरोपी अनिल विश्वनाथ सरवदे हे तिथे आले. त्यांनी उसने घेतलेले दीडशे रुपये दे म्हणून भांडणाची कुरापत काढली आणि लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार कत्तीने डाव्या कानावर, खांद्यावर आणि उजव्या दंडावर, पोटावर व पाठीवर मारुन गंभीर जखमी करीत खून करण्याचा प्रयत्न केला. जखमी विवेकानंद शिंदे यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, सपोनि सुनील गायकवाड, पीएसआय राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात विवेकानंद शिंदे यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजपूत हे करीत आहेत. आरोपी फरार आहे.