अन् काळाने हिरावला कुटुंबाचा आधारवड! भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:39 PM2022-01-31T22:39:10+5:302022-01-31T22:40:29+5:30
पांचाळ कुटुंबीयावर दु:खाचा काेसळला डाेंगर
राजकुमार जाेंधळे/लातूर: औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील बाप-लेकीचा साेमवारी सकाळी भरधाव हायवाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला अन् अख्ख्या गावावरच शाेककळा पसरली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या दत्तात्रय काेंडिबा पांचाळ यांच्या जाण्याने आई, अंध बहिणी, भाऊ, पत्नी आणि मुलाचा आधारवडच काळाने हिरावून घेतला आहे. या भीषण अपघाताने पांचाळ कुटुंबीयावर दु:खाचा डाेंगर काेसळला.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे जि. प. शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय कोंडिबा पांचाळ (वय ३८) यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली हाेती. सध्या ते पानचिंचाेली (ता. निलंगा) येथील एका तांड्यावरील शाळेत कार्यरत हाेते. गत अनेक दिवसांपासून ते आपल्या स्व-जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नशील हाेते. दरम्यान, त्यांच्या प्रयत्नाला काही महिन्यापूर्वीच यश आले. त्यांना मुलगी प्रतीक्षा (१३) आणि मुलगा प्रतीक (५) असे अपत्य हाेते. दरम्यान, मुलगी प्रतीक्षाचाही साेमवारच्या अपघातात मृत्यू झाला. वडील आणि बहिणीच्या जाण्याने चिमुकला प्रतीक पाेरका झाला आहे.
एकट्यावरच हाेता कुटुंबाचा भार...
आई आणि कुटुंबात असलेल्या तीन अंध बहिणींकडे, भावाकडे लक्ष देता येईल यासाठी त्यांची जिल्हा बदलीसाठी धडपड हाेती. वडिलांचे चार वर्षांपूर्वीच छत्र हरवल्याने शिक्षक दत्तात्रय पांचाळ हेच कुटुंबाचा आधार हाेते, तर भाऊ गावगाड्यात शेतीची औजारे तयार करून प्रपंच भागवत हाेता. आता गावाकडे बदली करून जाण्याशिवाय पर्याय नाही, यासाठी ते बदलीच्या प्रयत्नात हाेते. आता हा आधारच काळाने हिरावल्याने कुटुंबावर माेठे संकट काेसळले आहे.
प्रतीक्षा अभ्यासात हाेती हुशार...
लातुरातील जिजामाता कन्या विद्यालयात दत्तात्रय पांचाळ यांनी आपली मुलगी प्रतीक्षाचा इयत्ता आठवीत प्रवेश घेतला हाेता. प्रतीक्षा पूर्वीपासून अभ्यासात हुशार हाेती. वडिलांनी तिला सतत प्राेत्साहन दिले हाेते. काही दिवसांपासून ती शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत हाेती. त्यासाठीच साेमवारी शाळेत वडिलांसाेबत माेटारसायकवरून येत असताना हा भीषण अपघात झाला अन् यामध्ये दाेघेही जागीच ठार झाले.
सहा भावंडांचा कुटुंबकबिला...
मयत दत्तात्रय पांचाळ यांच्या कुटुंबामध्ये चार बहिणी आणि एक भाऊ असे बहीण-भावंडे आहेत. चारपैकी तीन बहिणी जन्मताच अंध, तर एक डाेळस आहे. एक भाऊ गावातच सुतारकीची कामे करताे. वडिलांनी काबाडकष्ट करून मुलींचे लग्न केले. दत्तात्रय यांना शिक्षण दिले. वडिलांच्या पश्चात दत्तात्रय हाच कुटुंबाचा आधार हाेते.