रॉंगसाईडने जाणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसने बाप-लेकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:44 PM2021-10-25T18:44:27+5:302021-10-25T18:46:03+5:30
accident near Ujani : अचानकपणे कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट (केए २८, एफ २४५४) ही बस चुकीच्या दिशेने वेगात आली.
उजनी (जि.लातूर) : चुकीच्या दिशेने कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट ही बस वेगात येऊन दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार ( father-son were crushed by a Karnataka state bus) झाले. ही घटना औसा-तुळजापूर महामार्गावरील उजनी मोड येथे सोमवारी दुपारी २ वा.च्या सुमारास घडली. मयत बाप-लेक हे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातांगळी येथील आहेत.
हनुमंत माणिक जगताप (७०) व ज्ञानेश्वर हनुमंत जगताप (३०, रा.भातांगळी, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद) असे मयत बाप-लेकाचे नाव आहे. भातांगळी येथील हनुमंत जगताप व ज्ञानेश्वर जगताप हे पिता-पुत्र सोमवारी औसा-तुळजापूर महामार्गावरील उजनी येथे शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकी (एमएच २५, झेड ४५३८) वरून आले होते. साहित्य खरेदी करून ते दुपारी गावाकडे मोटारसायकलवरून निघाले होते. ते उजनी मोड येथे आले असता, अचानकपणे कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट (केए २८, एफ २४५४) ही बस चुकीच्या दिशेने वेगात आली. बसने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील पिता-पुत्र हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भादा ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व परिसरातील नागरिकांनी तत्काळ या दोघांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
ज्ञानेश्वरचा तीन वर्षांपूर्वी विवाह...
मयत ज्ञानेश्वर जगताप याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो पुण्यातील कंपनीमध्ये काम करीत होता. कोविडमुळे लॉकडाऊन झाल्याने तो गावी परतला होता. तो शेतीत वडिलांना मदत करीत असे, असे नातेवाइकांनी सांगितले.
बासुंदीसाठी थांबतात बसेस...
उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील बासुंदीचा आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी बहुतांश वाहने थांबतात. त्यामुळे बहुतांश बसेस या ठिकाणी थांबतात. दरम्यान, काही बस चालक व वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करतात.