खरोश्यातील तलावाला गळती, दुर्गंधीमुळे रोगराईची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:37+5:302021-08-02T04:08:37+5:30
खरोसा : काही वर्षांपूर्वी श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या औसा तालुक्यातील खरोसा येथील सार्वजनिक गावतळ्यास गळती लागली आहे. दरम्यान, झाडे- ...
खरोसा : काही वर्षांपूर्वी श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या औसा तालुक्यातील खरोसा येथील सार्वजनिक गावतळ्यास गळती लागली आहे. दरम्यान, झाडे- झुडपे वाढली असून काही जण त्यात कचरा टाकत असल्याने पाण्याची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशातून औसा तालुक्यातील कारला येथे मठाधीश म्हणून वास्तव्याला असलेल्या नाथपंथी नाथ महाराजांनी सन १९१८ च्या दरम्यान खरोसा येथे तलाव बांधण्याची संकल्पना केली. ग्रामस्थांच्या श्रमदानातून सहा महिन्यात गावात तलावाचे काम झाले. त्यामुळे नाथ महाराजांनी भंडारा म्हणून ग्रामस्थांना भोजन दिले, असे सांगितले जात असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव खरपडे म्हणाले.
हा तलाव सर्व्हे क्र. २११ मध्ये ५ एकर २ गुंठे गावठाण जागेत बांधण्यात आला. विशेष म्हणजे हा तलाव कुठल्याही सरकारी योजनेतून बांधण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, सिमेंट, वाळू, चुन्याचा वापर न करता केवळ दगड- मातीने बांधण्यात आला आहे. भूकंपानंतर तळ्याच्या सभोवताली गाववस्ती झाली. त्यामुळे या परिसरात नागरिक, पशुधनांचा वावर वाढला.
दरम्यान, या तलावास सध्या गळती लागली आहे. त्यातच वस्तीतील काही जण कचरा टाकण्याबराेबरच परिसराचा वापर शौचासाठी करीत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी घाण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्याचा गावातील नागरिकांना त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तलावाची दुरुस्ती करावी, तसेच दुर्गंधी थांबण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
नोंद नसल्याने देखभाल नाही...
आम्ही गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात अभियंत्यांना दुरुस्तीसंदर्भात सांगितले, तेव्हा त्यांनी या तळ्याची नोंद आमच्याकडे नाही. ती कोणत्या विभागाकडे आहे, याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच गावातील व्यक्तीने तलावाचा ठेका घेतल्यामुळे आम्ही त्यात ब्लिचिंग पावडर टाकत नाही. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडतात. पाळूची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. दुरुस्तीसाठी २५ ते ३० लाख लागतील, असे ग्रामसेवक आय. आर. शेख म्हणाले.
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...
या तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. येथे सुशोभिकरण करावे. त्यामुळे नागरिक त्याची जपणूक करतील, असे सीताराम भातमोडे, सुभाष तोडकर, अजय साळुंके, राजकुमार तोडकर, शिवशंकर डोके, आत्मलिंग पाटील, विलास पाटील, अशोक खरपडे, दीपक डोके, पाश्यमियाॅ अत्तार म्हणाले.