लातूर झेडपी सीईओंच्या कार्यवाहीची धास्ती; ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षणास उपस्थिती
By हरी मोकाशे | Published: June 10, 2023 06:26 PM2023-06-10T18:26:59+5:302023-06-10T18:27:27+5:30
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले.
लातूर : ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामपंचायत कारभाराची माहिती व्हावी म्हणून मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गुरुवारपासून प्रशिक्षण सुरू आहे. पहिल्या दिवशी २५० पैकी २१० सदस्य अनुपस्थित असल्याचे आढळल्याचे दिसून आल्याने जिल्हा परिषदेच्या सीईओंनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सदस्यांनी धास्तीच घेतली. तिसऱ्या दिवशी शनिवारी १८७ जण उपस्थित राहिले.
ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा. मासिक, ग्रामसभा घेऊन त्यात विकासात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय कसे घ्यावेत. ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार कोणते, त्यांची कर्तव्ये काेणती अशा विविध बाबींची माहिती होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरूडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण झाले.
तीनदिवसीय प्रशिक्षणास लातूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचे २५० ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, गुरुवारी पहिल्या दिवशी केवळ ४० सदस्य उपस्थित असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांच्या पाहणीत आढळले. त्यामुळे सीईओंनी गांभीर्याने दखल घेत गैरहजर सदस्यांना नोटीस बजावून प्रशिक्षणावरील खर्च वसूल करण्याबरोबरच त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश लातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.
खुलासे, पुरावे सादर न केल्यास कार्यवाही...
प्रशिक्षणास गुरुवारी २१०, शुक्रवारी ९०, तर शनिवारी ६३ ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्याचे आढळून आले. सीईओंच्या आदेशामुळे प्रशिक्षणास सदस्यांची उपस्थिती वाढली आहे. गैरहजर सदस्यांकडून खुलासे घेऊन पुरावे तपासण्यात येणार आहेत. त्यात तथ्य आढळून न आल्यास कार्यवाही केली जाणार आहे.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत