शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती!

By हरी मोकाशे | Published: August 23, 2023 05:45 PM2023-08-23T17:45:13+5:302023-08-23T17:45:28+5:30

एमबीबीएस, एमएस, एमडीच्या विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान

Fear of deterioration of medical 'health' due to mid-term transfer in government medical college! | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती!

googlenewsNext

लातूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने अचानकपणे मध्यावधी कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या बदल्या केल्या आहेत. त्याचा परिणाम येथील एमबीबीएस, एमएस, एमडीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच रुग्णांच्या उपचारावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह कर्मचारी, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ७५० खाटांचे आहे. येथे अत्याधुनिक व दर्जेदार उपचार मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच सीमावर्ती भागातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे दररोज सकाळी येथे रुग्णांचा मेळाच भरल्याचे पहावयास मिळत आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज जवळपास दीड हजार रुग्णांची नोंदणी होते.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी मे- जूनमध्ये प्रशासकीय तर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये विनंतीवरुन बदल्या केल्या जातात. मात्र, यंदा ऑगस्टमध्ये मध्यावधी बदल्या करण्यात आल्या आहेत. रुग्णसेवा विस्कळीत होण्याबरोबरच पदवीपूर्व, पदव्युत्तर वैद्यीकीय शिक्षणावर परिणाम हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अध्यापकांच्या मुलांचे शिक्षण, वैयक्तिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

१७ जणांच्या बदल्यात ६ अध्यापक...
वैद्यकीय महाविद्यालयातील १७ अध्यापकांची बदली झाली आहे. त्या बदल्यात केवळ ६ अध्यापकांची येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे ११ अध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार अध्यापकांच्या जागा भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यात जवळपास २० टक्के जागा रिक्त आहेत. त्यात आता आणखीन पदे रिक्त राहत असल्याने पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय, आरोग्यसेवेलाही फटका बसण्याची भीती आहे.

सदरील बदल्या रद्द कराव्यात...
मध्यवधी प्रशासकीय बदल्या तात्काळ रद्द कराव्यात. तसेच यापुढे समुपदेशानाने बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी एमएसएमटीएच्या वतीने अधिष्ठातांमार्फत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव डॉ. गणेश बंदखडके, डॉ. शैलेंद्र चौहाण, डॉ. विनायक सिरसाठ, डॉ. सुनील स्वामी, डॉ. नागेश खुपसे आदींची उपस्थिती होती.

आरोग्य शिक्षण, सेवा कोलमडणार...
मध्यावधी बदल्या करणे अयोग्य आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच आरोग्यसेवाही कोलमडणार आहे. शिवाय, अध्यापकांच्या मुलांच्या शिक्षणाचे तसेच अन्य वैयक्तिक प्रश्न निर्माण हाेणार आहेत, असे वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी बोलणे टाळले.

दररोजची ओपीडी - १५००
मोठ्या शस्त्रक्रिया - २७
लघु शस्त्रक्रिया - ४४
एकूण विभाग - १९

Web Title: Fear of deterioration of medical 'health' due to mid-term transfer in government medical college!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.