जीवाच्या भीतीने बापाने आवळला मुलाचा गळा; किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: September 2, 2024 06:57 PM2024-09-02T18:57:12+5:302024-09-02T18:57:22+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : स्वतःचा मुलगा हा स्वयंपाक घरात धिंगाणा करीत असताना, भांडणात मुलाच्या कपाळावर काठीने मारले असता, ...
राजकुमार जाेंधळे / लातूर : स्वतःचा मुलगा हा स्वयंपाक घरात धिंगाणा करीत असताना, भांडणात मुलाच्या कपाळावर काठीने मारले असता, तो चक्कर येऊन खाली पडला. तो शुद्धीवर आल्यावर आपल्यालाच ठार मारेल, या भीतीपाेटी बापानेच मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना जढाळा (ता. चाकूर) येथे २९ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील जढाळा येथील मयत कृष्णा शिवाजी संगनगिरे (वय २९) हा २९ ऑगस्ट रोजी स्वयंपाकघरात धिंगाणा घालत हाेता. यावेळी मुलगा आणि वडिलांमध्ये वाद झाला. रागाच्याभरात वडिलांनी मुलाच्या कपाळावर काठीने मारले असता, मुलगा चक्कर येऊन फरशीवर पडला. आता तो शुद्धीवर आल्यावर आपल्याला ठार मारेल, या भीतीपाेटी शिवाजी विश्वनाथ संगनगिरे (वय ५३) यांनी मयताला बाजूच्या रूममध्ये घेऊन जात पलंगावर त्याचे दोन्ही हात-पाय बांधले. एक मुलगा डॉक्टराला बोलावण्यास गेला. तो घरी येईपर्यंत आरोपीची पत्नी सुशीला ही स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळ बसल्याचे पाहून मुलगा मयत कृष्णा हा शुद्ध आल्यावर आपल्याला जिवानिशी ठार मारेल, या भीतीने आणि रागाच्याभरात कृष्णाला पलंगावरच दोरीने गळा आवळून ठार केले. प्रारंभी ही घटना किनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. मात्र, डाॅक्टरांच्या तपासणीमध्ये गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांच्या तक्रारीवरून वडील शिवाजी विश्वनाथ संगनगिरे (वय ५३) यांच्याविरुद्ध किनगाव पोलिस ठाण्यात गुरनं. २४२/२०२४ कलम ११८ (१), १०३ (१) भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि. भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.