पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

By संदीप शिंदे | Published: January 13, 2024 05:12 PM2024-01-13T17:12:59+5:302024-01-13T17:13:20+5:30

यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे.

Fearing that the sugarcane would dry up due to lack of water, farmers turned towards Gurhala | पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

हाळी हंडरगुळी (लातूर) : परिसरातील काही शेतकऱ्यांचा कल गुळ उत्पादनाकडे पूर्वीपासूनच आहे. यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने ऊस वाळण्याच्या भितीपोटी शेतकरी गूळ गाळपाकडे वळत असल्याचे चित्र आहे.

हाळी हंडरगुळी गावांसह परिसरातील चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., शिवणखेड, कुमठा, वडगाव, वायगाव आदी शिवारात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे जेवढे लवकर असेल तेवढ्या लवकर ऊस शेतातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील विकास सहकारी साखर कारखाना युनिट-२ व शेजारील तालुक्यातील बालाघाट शेतकरी साखर कारखाना यांचे गाळप सुरु असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु तारखेची मुदत संपण्याच्या आतील ऊस कारखाना नेत नसल्याने तसेच ६७१, ८६०३२ या जातीच्या ऊसाला कारखाना प्राधान्य देत असल्याने व पाण्याअभावी ऊस वाळेल या भितीपोटी काही शेतकऱ्यांची मानसिकता गुऱ्हाळाकडे वळली आहे. सध्या हाळी हंडरगुळी परिसरात जवळपास १५ ते २० ठिकाणी गु्ऱ्हाळे सुरु आहेत. सध्या गुळाला प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये भाव आहे.

गुऱ्हाळ चालविणे झाले जिकरीचे...
पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण, मजुरांची टंचाई, खते व औषधांच्या वाढलेल्या किंमती यामुळे गुऱ्हाळे चालवणे अवघड झाले असल्याचे चिमाचीवाडी येथील रामराव गुणाले यांनी सांगितले. तर दरवर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन होते. मात्र गुळ साठवण्यासाठी या परिसरात वेअर हाऊस नसल्याने गुळाची साठवण करुन ठेवता येत नाही. त्यामुळे व्यापारी बेभावाने गुळ खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाकडे वेअर हाऊस उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचे दयानंद गुद्दे यांनी सांगीतले.

Web Title: Fearing that the sugarcane would dry up due to lack of water, farmers turned towards Gurhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.