लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची धास्ती वाढली; निवारणासाठी ४ कोटींचा आराखडा !
By हरी मोकाशे | Published: October 21, 2023 06:21 PM2023-10-21T18:21:28+5:302023-10-21T18:22:15+5:30
आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस : दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त साठा शून्य
लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी ४ कोटी २९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा उशिरा आणि कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यात जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून अगदी रिमझिम, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तद्नंतर जुलै अखेरपासून पावसाने ताण दिला आहे. ऑगस्ट महिना तर जवळपास कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस झाला. कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.
आता पावसाळा संपत आला आहे. परतीच्या पावसावर अपेक्षा होती. परंतु, तीही फोल ठरली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या दोन प्रमुख नद्यांसह छोट्या नद्याही वाहिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर ओढे-नालेही खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही तर विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.
मध्यम प्रकल्पात २८ टक्के उपयुक्त पाणी...
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून, त्यापैकी व्हटी आणि तिरू या दोन प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. उर्वरित सहापैकी साकोळ प्रकल्पात सर्वाधिक ६५.५८ टक्के तर तावरजा प्रकल्पात सर्वांत कमी ५.४० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. सहा प्रकल्पांमध्ये २८.३२ टक्के उपयुक्त पाणी आहे. तसेच लघु पाटबंधारेच्या १३४ तलावांमध्ये ८७.९८४ दलघमी म्हणजे २८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
नळयोजना दुरुस्तीवर विशेष भर...
पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई उद्भवू शकते, असा अंदाज वर्तवित जिल्हा प्रशासनाने ४ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. त्यात नळयोजना विशेष दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी २२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होईल, असे गृहित धरण्यात आले आहे. टँकरसाठी ५ लाख ४० हजार, विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी १५ लाख ५६ हजार, विंधन विहिरींसाठी ५९ लाख, तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी २५ लाख २० हजार तर विहिरीतील गाळ काढण्यासाठी २ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात...
तालुका - सरासरी पाऊस मिमीमध्ये
लातूर - ५३९.४
औसा - ४६४.९
अहमदपूर - ५२२.६
निलंगा - ५२७.८
उदगीर - ६८९.३
चाकूर - ४८०.६
रेणापूर - ४६६.१
देवणी - ६९९.४
शिरुर अनं. - ५२४.४
जळकोट - ५२६.९
एकूण - ५४०.०
व्हटी, तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली...
प्रकल्प - उपयुक्त जलसाठा (दलघमी)
तावरजा - १.०९९
व्हटी - जोत्याखाली
रेणापूर - ४.९४६
तिरू - जोत्याखाली
देवर्जन - ४.५२९
साकोळ - ७.१८०
घरणी - ८.५९७
मसलगा - ८.२४४
एकूण - ३४.५९५