भूगर्भशास्त्र तज्ज्ञांकडून हासोरीत पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
By राजकुमार जोंधळे | Published: September 15, 2022 05:44 AM2022-09-15T05:44:46+5:302022-09-15T05:45:22+5:30
भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था नवी दिल्ली यांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली
लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरी येथे जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यावरून स्वारातीम विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने बुधवारी भेट दिली. हासोरी हे गाव किल्लारीपासून जवळच असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या, तसेच धोकादायक घरामध्ये आश्रय न घेण्याचा सल्लाही पथकाने दिला.
भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था नवी दिल्ली यांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. भूकंप आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम व सुदृढ करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. नागरिकांनी मनातील भीती दूर करून क्षमता बांधणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला पथकाचा होता. जिल्हाधिकाऱ्यांनी भूकंप व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध टीम गठित करून त्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश दिले. धोकादायक इमारतींना तात्काळ नोटिसा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. संबंधितांना पर्यायी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय, जि.प. शाळा, समाजमंदिर येथे करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल, विजयकुमार ढगे, सुभाष जाधव, साकेब उस्मानी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. एस.बी. गायकवाड, विद्यापीठ पथकाचे प्रमुख डॉ. के. विजयकुमार, डॉ. अर्जुन भोसले, डॉ. अविनाश कदम, डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.