पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश
By संदीप शिंदे | Updated: June 7, 2024 18:30 IST2024-06-07T18:30:40+5:302024-06-07T18:30:55+5:30
शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर पुस्तके वाटप

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश
संदीप शिंदे, लातूर: समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील १० पंचायत समिती स्तरावरून मिळालेल्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे मागणी नोंदवली होती. आता पुस्तके तालुकास्तरावर दाखल झाली असून, शाळांकडे पोहोच केली जात आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची २ लाख ६७ हजार ७७२ असून, त्यांच्यासाठी तेवढ्या पाठ्यपुस्तक संचाची मागणी नोंदवण्यात आली होती. २०२४ - २५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असून, मराठी, उर्दू माध्यमांचा यात समावेश आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावर पोहोचवली आहेत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांत त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिनाभरापूर्वी बालभारतीकडून पुस्तके दहाही तालुक्यातील पंचायत समित्यांकडे रवाना करण्यात आली होती. ही पुस्तके पंचायत समितीमधून शाळांमध्ये पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत.
मराठी माध्यमाचे २ लाख ४३ हजार विद्यार्थी
पहिलीसाठी मराठी माध्यमाचे २७,८१४, दुसरीचे २७,८१४, तिसरी २७,४३९, चौथी ३१,०६१, पाचवी २७,५८२, सहावी ३१,८९६, सातवी ३४,२६६, तर आठवीच्या ३५ हजार २७१ अशा एकूण २ लाख ४३ हजार १४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
उर्दू माध्यमाचे २४ हजार ६२९ विद्यार्थी
पहिलीसाठी उर्दू माध्यमाचे ३,२६२, दुसरीचे ३,२६२, तिसरी ३,१५९, चौथी ३,१६९, पाचवी २,८८५, सहावी ३,०७१, सातवी २,८९६, तर आठवीच्या २ हजार ९२५ अशा एकूण २४ हजार ३१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १,२७१, उर्दू माध्यमाच्या १५१, हिंदी माध्यमाच्या दोन, इंग्लिश माध्यमाच्या २२८, अशा एकूण २,६५६ शाळा आहेत. यातील मराठी आणि उर्दू शाळेत या पुस्तकांचे वाटप होणार आहे.
शिक्षण विभागाकडून वितरणाचे नियोजन पूर्ण
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सीईओ अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीस्तरावर पुस्तके दाखल झाली असून, आता शाळांकडे पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. नियोजन पूर्ण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.
मराठी, उर्दु माध्यमाचे तालुकानिहाय पुस्तके वितरण
- अहमदपूर - २८७६२
- औसा - २८६१५
- लातूर - ८३४९७
- निलंगा - ३२३०२
- उदगीर - ४०७१९
- चाकूर - १६०४१
- रेणापूर - ११५७०
- देवणी - ८२९९
- जळकोट - ८९६०
- शिरुर अनं. - ७००४
- -------------------
- एकूण - २६७७७२