जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांच्या पॅनलमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:34+5:302021-01-08T05:02:34+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या हाळी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. गावात जिल्हा परिषदेच्या माजी ...
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या हाळी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. गावात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांच्या पॅनलमध्ये लढत होत असल्याने ही निवडणूक दुरंगी होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हाळी ग्रामंपचायत १५ सदस्यांची असून पाच प्रभाग आहेत. येथे मतदारांची संख्या ४ हजार ६४९ आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरी सुविधांवरुन ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव माने यांनी ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण केले. आता या निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील यांनी दंड थोपटले आहेत. सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवाजीराव माने यांनीही जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. स्थानिक मुद्यांवरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक चिन्हांची ओळख मतदारांना करून दिली जात आहे. कल्याण पाटील यांच्या पॅनलच्या प्रचारास मंगळवारी प्रारंभ झाला. गावातून प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शिवाजीराव माने यांनीही प्रचार रॅलीचे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही पॅनलकडून जोरदार तयारी सुरु असल्याने रंगत वाढत आहे.
पाण्याभोवती राजकारण...
हाळी गावासाठी कायमस्वरूपी पाणीयोजना नसल्याने वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती आहे. दर निवडणुकीत पाण्याचा मुद्दा उपस्थित करून राजकारण केले जाते. मात्र अद्याप हाळीचा पाणीप्रश्न सुटला नाही. त्यामुळे नागरिकांत संताप आहे. आता या निवडणुकीत हाळीचे मतदार कोणत्या उमेदवारांना पाणी पाजणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.