शिक्षकांची रिक्त पदे भरा; ग्रामस्थांनी ठाेकले शाळेला कुलूप, विद्यार्थ्यांचा मैदानात ठिय्या
By संदीप शिंदे | Published: August 12, 2024 04:08 PM2024-08-12T16:08:41+5:302024-08-12T16:10:59+5:30
रेणापूर तालुक्यातील खलग्री जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
रेणापूर : तालुक्यातील खलंग्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व एक शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पालक, ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे पदे भरण्याची मागणी केली. मात्र, दखल घेण्यात न आल्याने सोमवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठाेकून सामुहिक बहिष्कार टाकला.
खलंग्री येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेतील विद्यार्थी पटसंख्येसाठी ६ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यामध्ये मुख्याध्यापक, तीन प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर दोन शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून शिक्षक नाहीत. तसेच प्रतिनियुक्तीवर एक शिक्षक कोस्टगाव येथे कार्यरत आहे. तरीही दोन पदे रिक्त असून, ही पदे भरण्यात यावीत यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष व सरपंच महानंदा करमुडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेणापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पदे भरण्याची मागणी केली. मात्र, दखल घेतली नसल्याने सोमवारी शाळेला कुलूप लावून सामुहिक बहिष्कार टाकण्यात आला.
शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांचा ठिय्या...
जोपर्यंत रिक्त पदे भरली जाणार नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून, शाळेला कुलुप लावुन विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात ठिय्या मांडला. जोपर्यंत शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत, तोपर्यंत शाळेच्या आवारातच विद्यार्थी बसणार आहेत, असे रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे यांनी सांगितले. तात्काळ रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणीही करण्यात आली आहे.