अखेर ग्रामीण रुग्णालयास शववाहिकेची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:21+5:302021-04-24T04:19:21+5:30
चाकूर : तालुक्यातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचे येथील ग्रामीण रुग्णालयात निधन झाल्याने त्यांचा मृतदेह अंत्यविधीला नेण्याकरिता शववाहिका उपलब्ध ...
चाकूर : तालुक्यातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचे येथील ग्रामीण रुग्णालयात निधन झाल्याने त्यांचा मृतदेह अंत्यविधीला नेण्याकरिता शववाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नातेवाईकांना तब्बल दोन तास ताटकळत थांबावे लागले होते. हे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित होताच, तालुका प्रशासनाने त्याची दखल घेत अखेर ग्रामीण रुग्णालयास शववाहिका उपलब्ध करून दिली आहे.
तालुक्यातील एका गावातील एक व्यक्ती कोविड केअर सेंटरमध्ये चाचणी करून गावी परतली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात बोलाविण्यात आले. परंतु, त्यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. नातेवाईकांनी अंत्यविधीची मागणी केली; मात्र ग्रामीण रुग्णालयात शववाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी खासगी वाहनाचा शोध घेतला. खासगी वाहनधारकही येण्यास धजावत नव्हते. तेव्हा पत्रकार ओमप्रकाश लोया, सतीश गाडेकर यांनी रुग्णालयात जाऊन मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी प्रयत्न केले. दोन ते तीन तास मृतदेह रुग्णालयात होता. अखेर डॉ. नरवडे यांनी माणुसकी दाखवित वाहन उपलब्ध करून दिले. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीपर्यंत आणून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. तिथे अंत्यसंस्कार झाले.
प्रशासनाकडून वाहनाची सुविधा होईना, अंत्यसंस्कारास मृतदेह नेण्यासाठी वाहनाची दोन तास प्रतीक्षा, असे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द झाले. त्याची दखल घेत तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी एक वाहन ग्रामीण रुग्णालयास उपलब्ध करून दिले आहे.
वाहनामुळे अडचण दूर...
येथील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. उपचारादरम्यान एखादी व्यक्ती दगावते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी सांगितले.