अखेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीतून सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:17+5:302021-04-27T04:20:17+5:30
उजनी : लातूर-उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उजनी येथे ४ कोटी खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्यात ...
उजनी : लातूर-उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उजनी येथे ४ कोटी खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, तिचे हस्तांतरण न झाल्याने अद्यापही वापर सुरू झाला नव्हता. या संदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन सदरील इमारतीतून आरोग्यसेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील उजनी हे बाजारपेठेचे गाव आहे. औसा-तुळजापूर रस्त्यावर असलेल्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत ५ उपकेंद्र आहेत, तसेच आशिव, वांगजी, आशीव तांडा, चिंचोली, मासुर्डी, बिरबली, टाका, गुळखेडा, रिंगणीवाडी, एकंबी तांडा, कमालपूर, काकसपूर, धुत्ता, भंडारी येथील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत छोटीशी असल्याने बाळंतपणासाठी आलेल्या मातेची अडचण होत असे, तसेच इमारतीची पडझड झाली आहे. ही समस्या पाहून शासनाने ४ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत उभी केली.
ही नवी इमारत उभी करुन काही महिने उलटले. मात्र, अद्यापही हस्तांतरण अथवा आरोग्य केंद्राचे स्थलांतर झाले नव्हते. त्यामुळे कोविड लसीकरणासाठी आलेल्यांना बसण्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. या संदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. तातडीने नवीन इमारतीतून आरोग्य सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, शुक्रवारपासून नवीन इमारतीतून सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. नव्या इमारतीतून एकंबीचे सरपंच काकासाहेब पाटील यांना कोविडची लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एस. देवणीकर, औसा खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शेखर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कोपरकर, अॅड.सचिन सलगरे व कर्मचारी उपस्थित होते.
लवकरच सर्व सेवा...
नवीन इमारतीतून सध्या लसीकरण करण्यात येत आहे, तसेच जुन्या इमारतीतील आवश्यक साहित्य नवीन इमारतीत आणण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर, नव्या इमारतीतून रुग्णांना आरोग्यसेवा मिळतील, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एस. देवणीकर यांनी सांगितले.