अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

By संदीप शिंदे | Published: July 1, 2024 06:54 PM2024-07-01T18:54:20+5:302024-07-01T18:54:32+5:30

शासकीय स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला.

Finally, the government milk powder project of Udagir is scraped ! | अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

- विनायक चाकुरे
उदगीर :
तालुक्याचे वैभव असलेल्या शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता भंगारात निघाला आहे. शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या संस्थेच्या नावाने प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. यापूर्वी दूध डेअरी बचाव समितीने हा प्रकल्प ‘एनडीडीबी’कडे चालवण्यासाठी द्यावा, यासाठी प्रयत्न केले होते. डिसेंबर महिन्यात या पथकाने प्रकल्पाची पाहणी केली होती. आता हा प्रकल्प भंगारात गेल्यामुळे या ठिकाणी पुन्हा नवीन प्रकल्प होणार की १४ एकरचा भूखंड रिकामा राहणार याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणांनी तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत.

उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता ही दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. मलईविरहित दूध भुकटी ११.७ टन, तर पांढरे लोणी ५ टन उदगीर दूध भुकटी प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा, कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशात अनेक भागांत विकले जात होते व यातून राज्य शासनास चांगला उत्पन्न मिळत होते. सुरुवातीला या प्रकल्पात ५३५ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळत होता. तर या भागातील हजारो शेतकऱ्यांना शेतीपूरक म्हणून दूध उत्पादनाद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले होते. २४ वर्षे हा प्रकल्प उत्तमरीत्या चालून शेवटी जो बंद पडला तो आजपर्यंत पुन्हा सुरू झालाच नाही.

भंगार गेल्यावर इमारत जमीनदोस्त होणार...
माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीमध्ये २९ जानेवारी रोजी दूध डेअरीच्या प्रांगणात शेतकरी संवाद मेळावा घेऊन या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत डेअरीचे पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली होती. बरोबर एक महिन्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी हा प्रकल्प आहे त्या परिस्थितीमध्ये भंगारात विकण्याची निविदा शासनाने प्रसिद्ध केली आहे. आता या ठिकाणचे भंगार गेल्यानंतर सदरील इमारत जमीनदोस्त करण्यात येईल, यानंतरच केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला तरच नवीन प्रकल्प उभा राहू शकतो.

नव्याने प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न...
उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत दूध डेअरी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, दुग्ध विकासमंत्री यांची भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्रीय दुग्धविकास मंत्र्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. सदरील प्रकल्पाची ‘एनडीडीबी’मार्फत पाहणी करून या ठिकाणी नव्याने प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले होते.

आता नागरिकांच्या नजरा ‘एनडीडीबी’कडे...
अनेक शासकीय दूध योजनेचे प्रकल्प भंगारात निघाले आहे. उदगीर येथील दूध योजना व दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी नव्याने उभी करण्यासाठी ‘एनडीडीबी’शिवाय पर्याय नसल्याने येणाऱ्या काळात ‘एनडीडीबी’ काय भूमिका घेते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघण्याची निविदा पूर्ण झाली असली, तरी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे व खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यामार्फत ‘एनडीडीबी’कडे पाठपुरावा करू, असे समितीचे निमंत्रक मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

Web Title: Finally, the government milk powder project of Udagir is scraped !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.