लॉकडाऊनमध्ये पोस्टबँकेकडून आर्थिक आधार; पावणेचार कोटी रुपये केले घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:53+5:302020-12-24T04:18:53+5:30
लातूर जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय लातूर शहरात असून, शिवाय पोस्ट शाखांमध्येही पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
लातूर जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय लातूर शहरात असून, शिवाय पोस्ट शाखांमध्येही पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या बँकेचे ५० हजारांहून अधिक खातेदार आहेत. सर्व व्यवहार पेपरलेस असल्याने या बँकेकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. लाॅकडाऊन काळात पोस्ट पेमेंट नागरिकांसाठी आधार ठरली होती. २३ मार्चपासून लाॅकडाऊन लागू झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. उद्योग व्यवसायाबरोबर दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली होती. या दरम्यान बँकाही काही दिवस बंद होत्या. शिवाय, एटीएममध्येही खडखडाट असायचा. या परिस्थितीत पोस्ट पेमेंट बँकेने लातूर जिल्ह्यात २५० पोस्टमनच्या सहाय्याने पोस्ट बँकेतील १६ हजार ५२७ खातेधारकांना घरपोच ३ कोटी ८७ लाख रुपयांचे वितरण केले. तसेच आधार इनाबल सिस्टीमद्वारे पोस्टातून रक्कम काढून देण्यात आली. तसेच शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थ्यांची खाती उघडून देण्यात आली असल्याचे लातूर पोस्ट कार्यालायतार्फे सांगण्यात आले.
१०५० विद्यार्थ्यांनी पोस्टात खाती काढली
लाॅकडाऊन काळात जिल्ह्यातील १ हजार ५० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपली पोस्ट पेमेंट बँकेत खाती उघडली आहेत. तसेच आधार अपडेट असलेल्यांची खाते उघडणे सुरू आहे.
तात्काळ सेवेवर भर
लाॅकडाऊन काळात पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. त्याअंतर्गत १६ हजार ५२७ व्यक्तींना ३ कोटी ८७ लाख रुपये घरपोच वितरीत करण्यात आले. तात्काळ सेवेवर भर आहे.
- बी. रविकुमार,
डाक अधीक्षक, लातूर
आधार इनॅबल पेमेंट सिस्टीमचा दिला लाभ
बँका काही दिवस बंद असल्यामुळे तसेच एटीएममध्ये पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी पोस्ट कार्यालयातील आधार इनॅबल सिस्टीमचा लाभ देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, मनरेगा अशा विविध शासकीय योजनांची रक्कम पोस्ट बँकेतून नागरिकांना काढून देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाते उघडण्याचे काम करण्यात आले.