लातूरात किराणा होलसेल दुकानाला आग; ३० ते ३५ लाखांच्या सामानाची राख
By हणमंत गायकवाड | Published: February 20, 2024 05:50 PM2024-02-20T17:50:30+5:302024-02-20T17:50:58+5:30
अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
लातूर: शहरातील एक नंबर चौकात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रुद्र होलसेल किराणा दुकानाला अचानक आग लागली. या आगीत अंदाजे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. फर्निचर,टीव्ही, फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच किराणा वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान,अग्निशमन दलाच्या चार बंबद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
बार्शी रोडवरील एक नंबर चौकात असलेल्या हॉटेल साई इंटरनॅशनलच्या इमारतीत असलेल्या रुद्र किराणा होलसेल दुकानाला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाला लागल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पहाटे पाच वाजून २१ मिनिटांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. लागलीच दुसरी गाडी आली. अशा एकूण चार बमद्वारे अग्निशमन दलाच्या जवानांनी अग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत किराणा दुकानातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेरे, किराणा वस्तू,होलसेल साहित्य जळून खाक झाले. अंदाजे ३० ते ३५ लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वरती येण्यात आला आहे. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागली असावी असा अंदाज आहे. मात्र नेमके कारण समजलेले नाही.
अग्निशमन दल घटनास्थळी;मोठा अनर्थ टळला...
आग लागलेल्या रुद्र होलसेल किराणा दुकानाच्या शेजारी अन्य दोन किराणा दुकान आहेत तर बाजूला याच बिल्डिंगमध्ये हॉटेल साई इंटरनॅशनल आहे तर तळमजल्यामध्ये एका बँकेची शाखा आहे. मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये हे दुकान असून मोठे हॉटेल आहे अग्निशमन दलाच्या गाड्या लवकर येऊन आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अग्निशमन दलाचे चार बंबने आग आटोक्यात...
दरम्यान अग्निशमन दलाचे आनंद कांबळे, पवन शिंदे, रवी भोसले,महबूब शेख, मोहसीन शेख, संदीप रणखांब, एम.ए. बोणे, रामेश्वर जाधव, बाळासाहेब जाधव, हसन शेख, कृष्णा दिवे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.