शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना अग्निशमन दलाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:48 AM2021-01-13T04:48:29+5:302021-01-13T04:48:29+5:30

भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. शासकीय रुग्णालयाचे फायर, स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ...

Fire brigade notices to 75 private hospitals in the city | शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना अग्निशमन दलाच्या नोटिसा

शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना अग्निशमन दलाच्या नोटिसा

googlenewsNext

भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. शासकीय रुग्णालयाचे फायर, स्थापत्य आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयाचे गेल्या दोन दिवसांपासून ऑडिट करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयाचेही ऑडिट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील खासगी रुग्णालयांना एनओसी घेण्याबाबत सूचित केले आहे. आग प्रतिबंधक कायदा २००६ नुसार रुग्णालयामध्ये अग्निशमन दलाच्या सर्व यंत्रणा असणे बंधनकारक आहे. त्याला खासगी रुग्णालये अपवाद नाहीत. त्यामुळे या रुग्णालयांकडे अग्निशमन दलाची एनओसी आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. लातूर शहरांमध्ये खासगी रुग्णालयांची संख्या २००च्या घरात आहे. त्यापैकी १६५ रुग्णालयांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात नोंदणी केलेली आहे. यातील ८७ रुग्णालयांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. उर्वरित ७५ रुग्णालयाने अध्याप ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे या रुग्णालयांना ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्यास रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार झालेली नोंदणी रद्द करण्यात येईल, असेही या नोटिशीत म्हटले आहे.

३३ खासगी रुग्णालयांनी घेतले नूतनीकरण प्रमाणपत्र...

दर तीन वर्षांनी नूतनीकरण प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन फक्त ३३ खासगी रुग्णालयांनी केले आहे. ५४ रुग्णालयांनी नूतनीकरण प्रमाणपत्र घेण्यास दुर्लक्ष केले आहे. राज्यात घडणाऱ्या दुर्घटनेबाबत गांभीर्य ओळखून अत्यावश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे खासगी रुग्णालयांचेही दुर्लक्षच आहे. ना हरकत आणि नोंदणी नूतनीकरण घेण्याबाबत वारंवार सूचना करूनही, त्याकडे रुग्णालयांचे दुर्लक्ष असल्याचे मनपाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

परत नोटिसा पाठविणार..... (कोट)

शहरात अंदाजे दोनशेपेक्षा अधिक खासगी रुग्णालयांची संख्या आहे. यापैकी १६५ रुग्णालयांची आमच्याकडे नोंद आहे. फक्त ८७ रुग्णालयाने या वर्षी एनओसी घेतली आहे. तीन रुग्णालयांकडे तात्पुरती एनओसी आहे. ७५ रुग्णालयांकडे अध्याप एनओसी नाही. या सर्व रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या नियम व अटीनुसार रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उभी असवी. नोंदणी प्रमाणपत्र न घेतल्यास, परत नोटिसा पाठविल्या जातील.

शेख, अग्निशमन अधिकारी लातूर मनपा

Web Title: Fire brigade notices to 75 private hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.