अग्निशमन वाहन लोकार्पणावरुन रेणापूरमध्ये लागली आग; नगरपंचायत कार्यालयास ठोकले टाळे
By हरी मोकाशे | Published: February 16, 2023 06:10 PM2023-02-16T18:10:13+5:302023-02-16T18:10:28+5:30
महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानअंतर्गत रेणापूर नगरपंचायतीस चार दिवासांपूर्वी अग्निशमन वाहन मिळाले.
लातूर : रेणापूर नगरपंचायतीस मिळालेल्या नवीन अग्निशमन वाहनाचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केले. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यावर आक्षेप घेऊन निषेध केला. माजी पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नाही, असे म्हणत गुरुवारी नगरपंचायतीस टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी केली.
महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानअंतर्गत रेणापूर नगरपंचायतीस चार दिवासांपूर्वी अग्निशमन वाहन मिळाले. मंगळवारी माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या वाहनाचे बाजार मैदानावर लोकार्पण केले. वास्तविक, नगरपंचायतीच्या या पदाधिकाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्याने आठ महिन्यांपासून नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदार काम पाहत आहेत. दरम्यान, या वाहनाचा लोकार्पण सोहळा प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते होणे अपेक्षित असताना माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी करणे योग्य नाही.
बाजार मैदानावर हे वाहन घेऊन जाण्यासाठी कोणी परवानगी दिली?, अशा पध्दतीने कार्यक्रम घेता येतो का? असा प्रश्न उपस्थित करून नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शहर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने गुरूवारी सकाळी नगरपंचायतीस टाळे ठोकले. जोपर्यंत आमच्या मागण्यांचे निवेदन प्रशासक तथा तहसीलदार हे स्वत: घेणार नाहीत, तोपर्यंत टाळे काढणार नाही, असा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले. दोन तासानंतर तहसीलदार तथा प्रशासक धम्मप्रिया गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात संगांयोचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बालाजी कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतिनअली सय्यद, माजी नगरसेवक भुषण पनुरे, शिवसेने (ठाकरे) चे शहरप्रमुख संजय इगे, नानासाहेब काळे, अमोल पवार, बाळासाहेब कातळे, नरसिंग कातळे, सचिन इगे, अजय चक्रे, सतीश चव्हाण, सुरज वंगाटे, चंद्रकांत गिरी, रोहित गिरी आदी सहभागी झाले होते.
कर्मचारी अडकले कार्यालयात...
नगरपंचायतीत सर्व कर्मचारी सकाळी पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले. तब्बल दोन तास कुलूप होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. बाहेरुन कोणालाही आतमध्ये अथवा आतमधून कोणालाही बाहेर पडता येत नव्हते.