अग्नी प्रतिबंधक नळकांड्या गायब !
By Admin | Published: November 10, 2014 01:12 AM2014-11-10T01:12:44+5:302014-11-10T01:17:33+5:30
लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे
लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे कोणतेही साहित्य नसल्याचे समोर आले आहे़ ‘लोकमत’ चमूने रविवारी दुपारी १२ ते १़३० वाजेपर्यंत लातूर बसस्थानकात लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या आहेत का? याचे स्टिंग आॅपरेशन केले़ दीड तासात लातूर बसस्थानकात पाहिलेल्या १५ गाड्यांपैकी केवळ एका बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ त्याचीही कालमर्यादा संपलेलीच़
दोन दिवसांपूर्वी देगलूर आगाराच्या धावत्या बसला अचानक आग लागली होती़ या घटनेचा बोध घेऊन, बसेसमधील अग्नी प्रतिबंधक नळकांड्या व अन्य साहित्य ठेवले जाईल अशी अपेक्षा होती़ परंतु बहुतांश गाड्यामध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे निदर्शनास आले आहे़ शोभेची वस्तू म्हणून तरी महामंडळाने अग्नी प्रतिबंधक उपाययोजना नळकांड्या ठेवल्या नाहीत़
निजामाबाद-मंगळवेढा, उदगीर-सोलापूर, अहमदपूर-सोलापूर, लातूर-पोहरेगाव, लातूर-पानगाव, लातूर-नांदेड, नांदेड-भोकर, लातूर-औसा, औसा-लातूर, निलंगा-गुलबर्गा, भोकर-अक्कलकोट, उदगीर-पुणे, लातूर-उदगीर या बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याच्या प्रतिबंधक नळकांड्या नावालाही नव्हते़ चालकाच्या पाठीमागे अथवा बसच्या आतील मागच्या बाजूस आग प्रतिबंधक नळकांड्या बसविण्याचा नियम आहे़ परंतु या १४ बसेसमध्ये आग प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे स्टिंग आॅपरेशन नंतर समोर आले आहे़ जालना-गुलबर्गा या बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ परंतु त्याची कालमर्यादा संपलेली होती़ तीन प्रकारचे अग्नी प्रतिबंधक नळकांड्या असतात़ एक पाण्याने भरलेली, दुसरी केमिकलयुक्त पावडरने भरलेली तर तिसरी गॅसने भरलेली असते़ यापैकी कोणतीही एक अग्नी प्रतिबंधक नळकांडी असावी, असा नियम आहे़ परंतु या नियमाचे महामंडळाच्या बसेसमधून उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी प्रवासी बसेसना अग्नी प्रतिबंधक नळकांड्याची सक्ती केली आहे़ ज्या खाजगी बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नाहीत, अशा बसेसची प्रवाशी वाहतुकीची नोंदणी रद्द करण्यात येते़ काल-परवाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक नियमांचे आणि बसेसच्या रचनेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे १५ बसेस जप्त केल्या आहेत़ इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने मात्र देगलूर घटनेचाही बोध घेतला नाही़ प्राथमिक आग आटोक्यात आणण्यासाठी या नळकांड्या यशस्वी ठरू शकतात़ आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर या नळकांड्यांच्या द्वारे आग विझविता येवू शकते़ परंतु महामंडळाच्या बसेसमधूनच या नळकांड्या गायब झाल्या आहेत़