लातूरची गुणवंत विद्यार्थिनी रेणुकाच्या मदतीला सरसावले फिरोदिया फाऊंडेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:37 PM2020-08-04T14:37:21+5:302020-08-04T14:39:36+5:30
माता-पित्याविना पोरक्या मुलींना मिळाला मोठा आधार
लातूर : बालपणी वडील गेले अन् दहावी निकालाच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने आईही गेली. घरात तीन बहिणींशिवाय कोणीच नाही. सर्वात मोठी रेणुका दिलीप गुंडरे ही ९३.२० टक्के गुण मिळवून गुणवंत ठरली. मात्र, तिचे कौतुक पाहायला आई नव्हती. तिची ही हृदयद्रावक कहाणी ‘लोकमत’मधून उमटल्यानंतर अहमदनगरच्या शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर तसेच लातूर लोकमत कार्यालयात दूरध्वनी करून रेणुकाची अधिक माहिती जाणून घेतली. रेणुका दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या दोन लहान बहिणी चौथी व सातवी वर्गात शिकतात. त्या तिघींचाही सांभाळ करायला घरात वडील नव्हते आणि आईही गेली. रेणुका हुशार आहे. ती लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढे सनदी अधिकारी होऊ इच्छिते. पाठीमागे दोन लहान बहिणींना लातूरमध्येच एखाद्या वसतिगृहात प्रवेश देऊन पुढील शिक्षण द्यावे, असा तिचा मानस आहे. निकटचे नातेवाईक तिला धैर्य देत आहेत. काही व्यक्ती व संस्थांनीही मदत केली आहे. अहमदनगरच्या फिरोदिया फाऊंडेशनने तर तिन्ही बहिणींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची ग्वाही दिली आहे.
शिक्षणमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन
रेणुकाच्या या हृदयद्रावक कहाणीचे वृत्त ‘लोकमत’च्या दिल्ली, मुंबई, अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूरसह सर्वच आवृत्त्यांमध्ये उमटले होते. त्यानंतर शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने दखल घेतली. ‘लोकमत’चे वृत्त वाचून स्वत: शिक्षणमंत्र्यांनी रेणुकाला दूरध्वनी करून सर्व तऱ्हेची मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. तात्पुरत्या स्वरूपात काही मदतही पोहोचविल्याचे अमर खानापुरे यांनी सांगितले.