आधी मराठा आरक्षण, मगच शासकीय योजनांचा जागर; भारत संकल्प यात्रेचा रथ मुरुडात अडविला
By संदीप शिंदे | Published: December 28, 2023 06:41 PM2023-12-28T18:41:05+5:302023-12-28T18:41:14+5:30
केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे.
मुरुड (जि.लातूर) : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम होत आहे. गुरुवारी दुपारी मुरुड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी दाखल झालेला रथ मराठा समाज बांधवांनी अडवित परत पाठविला. आधी आरक्षण द्या, मगच शासकीय योजनांचा जागर करा अशी भुमिका त्यांनी घेतल्याने संकल्प यात्रा रथ आणि कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागले.
केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. या रथासोबत शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत असून, गावोगावी जाऊन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी संकल्प यात्रेच्या रथाद्वारे मुरुड येथे शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार होती. त्यासाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात आली होती. मात्र, नियोजित ठिकाणी रथ पोहोचताच मराठा समाजबांधवांनी या रथास विरोध केला. आधी आरक्षण द्या, मगच शासकीय योजनांचा जागर करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे रथ आणि कर्मचाऱ्यांना परत फिरावे लागले.