आधी मतदान, नंतर चारधाम! मतदान करूनच बसेस यात्रेला धावणार
By राजकुमार जोंधळे | Published: May 3, 2024 01:31 AM2024-05-03T01:31:01+5:302024-05-03T01:31:24+5:30
लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी ...
लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी निघणाऱ्या यात्रेकरुंनी आधी मतदान करू, मगच चारधाम करू असे सांगितले. त्यामुळे यात्रा कंपनीला नियाेजन पुढे ढकलावे लागले.
लातूर लाेकसभेसाठी ७ मे राेजी मतदान हाेणार आहे. मतदानाची तारीख जाहीर हाेण्यापूर्वीच लातूर येथील एका यात्रा कंपनीने नेहमीप्रमाणे २ मे राेजी चारधामसाठी बसेस साेडण्याचे नियाेजन केले हाेते. त्यासाठी १०५ जणांनी तीन बसेससाठी प्रवास शुल्क भरले हाेते. शाळांना उन्हाळी सुटी लागली आणि २ मे पर्यंत मतदानही हाेऊन जाईल, या अपेक्षेने चारधामची यात्रा निश्चित करण्यात आली हाेती. मात्र, मतदानाची तारीख ७ मे राेजी जाहीर झाल्यानंतर चारधाम यात्रा करणाऱ्या बहुतेकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रशासन आणि काही जागरूक यात्रेकरुंनी मतदानासाठी सर्वांचेच मन वळविले आणि मतदान करूनच चारधाम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मतदान राष्ट्रीय कर्तव्य...
यात्रा कंपनीचे श्रीराम बेंडके म्हणाले, प्रशासनाचे आवाहन आणि यात्रेकरुंच्या मागणीनुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. कंपनीलाही मतदान करणे प्रथम कर्तव्य असल्याची जाणीव असल्याने तत्पर निर्णय घेतला.
प्रत्येकाने मतदान करावे...
यात्रेकरू माेहन झुंजे पाटील म्हणाले, आम्ही १०५ जण यात्रेसाठी जसे निघालाे आहाेत, तसे अनेक कंपन्या चारधामचे नियाेजन करतात. तसेच अनेकांच्या सहलीचे नियाेजन असते. परंतु, मतदान करणे आपले कर्तव्य असल्याने, सर्वांनीच सहली, धार्मिक यात्रांचे वेळापत्रक एका दिवसासाठी बदलावे अथवा मतदान करून निघावे, असे आवाहनही त्यांनी केले.