लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी
By हरी मोकाशे | Published: February 7, 2024 04:44 PM2024-02-07T16:44:13+5:302024-02-07T16:44:36+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे.
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या अडचणी, तक्रारींचा तात्काळ निपटारा करुन समस्याग्रस्तांचे विनाविलंब समाधान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु केला आहे. या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांना थेट सीईओंसमोर तक्रारी मांडता येणार आहेत.
जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. जिल्हा परिषदेअंतर्गत सामान्य प्रशासन, अर्थ, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असे विविध विभाग आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. गाव पातळीवर अथवा पंचायत समिती स्तरावर अडीअडचणींची न सुटल्यास सदरील नागरिक जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. त्यामुळे विविध कामानिमित्ताने दररोज ग्रामीण भागातील नागरिकांची रेलचेल असते. तक्रारी घेऊन आलेल्यांना लवकर समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा असते.
सीईओंसह सर्व विभागप्रमुख...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी सीईओ यांच्यासह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु करणार आहेत.
पहिल्या दिवशी चार तक्रार...
जिल्हा परिषदेत सीईओ अनमोल सागर यांच्या समोर प्रयोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला. गेल्या महिनाभरात तक्रार दाखल केलेल्यांपैकी काही जणांना बुधवारी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी चौघजण उपस्थित होते. त्यातील एका प्रकरणासंदर्भात तात्काळ तपासणीचे आदेश सीईओंनी बांधकाम विभागास दिले.
अशा प्रकरणांवर होणार नाही सुनावणी...
ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली तक्रार जर मुख्यमंत्री कार्यालय, आपले सरकार, लोकशाही दिन, न्यायालयात अथवा लोकायुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असल्यास त्या प्रकरणांवर जिल्हा परिषदेत सुनावणी होणार नाही.
ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त उपक्रम...
सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतही आता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु करण्यात येत आहे. हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तक्रारी, समस्यांचा जलद गतीने निपटारा होईल.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.