गंभीर गुन्हे असणाऱ्या पाच सराईत गुन्हेगार एक वर्षांसाठी तडीपार; लातूर पोलिसांची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: March 17, 2025 19:58 IST2025-03-17T19:58:10+5:302025-03-17T19:58:10+5:30
लातूर, उदगीर शहरात टाेळ्या सक्रिय...

गंभीर गुन्हे असणाऱ्या पाच सराईत गुन्हेगार एक वर्षांसाठी तडीपार; लातूर पोलिसांची कारवाई
लातूर : शहरासह उदगिरात सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना एक वर्षांसाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी साेमवारी केली.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चौक आणि उदगीर शहरात टोळ्या तयार करून सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना पाेलिसांनी कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये अक्षय ऊर्फ आकाश राम तेलंगे (वय २१, रा. गोपाळनगर, लातूर), साहिल महबूब सय्यद (रा. संजयनगर, लातूर), बालाजी रामराव डोंगरे (५८, रा. इंदिरानगर उदगीर), किशोर कोंडिबा धनवाले (४०, रा. गणेशनगर, उदगीर) आणि कृष्णा प्रल्हाद गाडेकर (३०, रा. सोमनाथपूर, उदगीर) या गुन्हेगारांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यांतील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल...
सराईत गुन्हेगारांविराेधात लातूर शहरातील विवेकानंद चौक, उदगीर शहर आणि लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील नागरिकांच्या मालमत्तांना इजा पोहोचून भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करणे, आजन्म कारावास अथवा अन्य कारावासाच्या शिक्षेला पात्र असलेले गुन्हे करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आदीं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांमुळे सामाजिक शांतता धोक्यात आली हाेती. पाेलिसांनी त्यांना एक वर्षांसाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
गुन्हेगारांचा डेटा संकलित; तडीपारीसाठी प्रस्ताव तयार...
लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्यांना पाेलिसांनी धडा शिकविण्याचा निर्णय घेतला असून, साेमवारी पाच जणांवर तडिपारीची कारवाई केली आहे तर इतरांच्या तडिपारीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक