खाेटा विवाह लावून पाच लाखांना गंडविले; पाच जणांविरुद्ध गुन्हा : घनसरगावची घटना...
By राजकुमार जोंधळे | Published: April 14, 2024 12:27 AM2024-04-14T00:27:58+5:302024-04-14T00:28:12+5:30
आरोपींनी तीन तोळे सोन्याचे दागिने, पाच तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम १ लाख ६२ हजार रुपये आणि घरात ठेवलेले १ लाख ३० हजार असे एकूण ५ लाख १ हजारांची फसवणूक केली.
राजकुमार जाेंधळे / लातूर : खाेटा विवाह करून घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम नेत पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घनसरगाव (ता. रेणापूर) येथे घडली. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील फिर्यादी बळीराम राजाभाऊ कापसे यांच्याशी बुधवार, १० एप्रिलरोजी घनसरगाव येथे खोटा विवाह केला. पाच जणानी संगणमत करून फिर्यादीसाेबत खोटा विवाह करुन फसवणूक केली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रंजना विलास मस्के (रा. मोतीनगर, लातूर), कृष्णा दत्तात्रय दिंडे (रा. धसवाडी ता. अहमदपूर), वर्षा दत्तात्रय मरेवाड, गणेश बुलबुले, मंगलबाई (पूर्ण नाव माहीत नाही, रा. लातूर) यांच्यासह इतरांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी बुधवार, १० एप्रिलरोजी घनसरगाव येथे फिर्यादीसोबत खोटा विवाह केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, शिवाय, रोख रक्कम असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल घेवून घरातून निघून गेले.
आरोपींनी तीन तोळे सोन्याचे दागिने, पाच तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम १ लाख ६२ हजार रुपये आणि घरात ठेवलेले १ लाख ३० हजार असे एकूण ५ लाख १ हजारांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अजय घुले हे करीत आहेत.