पशुधनांची चाेरी करणाऱ्या आंतर जिल्हा टाेळीतील पाच जणांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: July 23, 2023 08:55 PM2023-07-23T20:55:57+5:302023-07-23T20:56:19+5:30
वाहनासह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर: पशुधनांची चाेरी करणाऱ्या टाेळीतील पाच जणांना चाकूर पाेलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. रात्रीच्या गस्तदरम्यान हे चाेरटे पाेलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून चाेरीतील पशुधन आणि वाहन असा ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर ठाण्याच्या हद्दीत रात्री गस्तीवर असलेल्या पाेलिसांना झरी (खु.) गावानजीक संशयास्पद पिकअप वाहन दाेन गायी घेऊन भरधाव जाताना आढळून आले. त्या वाहनाला पाेलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वेग वाढवत पलायन केले. याची माहिती चाकूर उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली. उपविभागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहन ताब्यात घेतले. झाडाझडती घेत सखाेल चाैकशी केली असता, त्यांनी झरी गावातून या गायी चाेरल्याची कबुली दिली. अधिक चाैकशी केली असता त्यांनी चाकूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून यापूर्वी चारवेळा साथीदाराच्या मदतीने पशुधनांची चाेरी केल्याचे सांगितले.
याप्रकरणी ज्ञानोबा नागनाथ मोहाळे (रा. कातकरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), मारुती दंतराव हरगिले (रा. कासारवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी), राजू नारायण पोपतवार (रा. लांजी ता. अहमदपूर जि. लातूर), शेख कलीम शेख बुऱ्हान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, पूर्णा जि. परभणी) आणि इरफान उस्मानसाब कुरेशी (रा. बागवान गल्ली, अहमदपूर जि. लातूर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चाेरीतील दाेन गायी, दाेन म्हशी, एक वासरू, एक बैल असे सहा पशुधन, गुन्ह्यातील वाहन असा ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरवाडे, पोलिस उपनिरीक्षक मोरे, अंमलदार शिरसाठ, मस्के, वाघमारे, लांडगे, पेद्देवाड यांच्या पथकाने केली.