रावणकोळ्यातील दोन तरुणांच्या खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

By हरी मोकाशे | Published: January 14, 2024 05:43 PM2024-01-14T17:43:02+5:302024-01-14T17:43:14+5:30

ऑनलाइन दुकान बंद केल्यावरून हत्या.

Five suspects arrested in connection with the murder of two youths in Ravanakola | रावणकोळ्यातील दोन तरुणांच्या खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

रावणकोळ्यातील दोन तरुणांच्या खूनप्रकरणी पाच संशयित ताब्यात

जळकोट (जि. लातूर) : तालुक्यातील रावणकोळा येथील दोन तरुणांवर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. याप्रकरणी जळकोट पोलिसांत रविवारी पहाटे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील रावणकोळा येथील तलावाच्या पाळूनजीक आरोपी प्रकाश मुरहरी सूर्यवंशी, अमित माधव गायकवाड, सुदर्शन (टुब्या) दयानंद सूर्यवंशी, शैलेजा यादव सूर्यवंशी, सतीश सुखराज वाघमारे (रा. रावणकोळा) हे शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याने एकत्र जमले. त्यांनी महेश उत्तम सूर्यवंशी (वय २१) व विकास शिवाजी सूर्यवंशी (२७) या चुलत भावंडांसोबत गावातील ऑनलाइन दुकान बंद केल्याच्या कारणावरून तक्रार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, चाकूने वार केले. त्यात महेश सूर्यवंशी व विकास सूर्यवंशी हे दोघे गंभीर जखमी होऊन गतप्राण झाले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत व पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मृत महेशची आई वैजयंतीमाला उत्तम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रविवारी पहाटे वरील पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले. रविवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली.

अगोदर पतीचे दु:ख, आता मुलांचे...

मृत महेश सूर्यवंशी याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ आईच करीत आहे. विशेषत: त्याला बहीण, भाऊ नसल्याने तो एकटाच होता. तसेच मृत विकास सूर्यवंशी याच्याही वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे मातृछायाच आहे. दरम्यान, मृत दोन्ही मुलांच्या आईंनी शनिवारी रात्री पोलिस ठाण्यात टाहो फोडला. अगोदरच पतीचे आणि आता मुलांचे दु:ख आले आहे, असे म्हणत आक्रोश करीत होत्या.

Web Title: Five suspects arrested in connection with the murder of two youths in Ravanakola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर