महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
By हणमंत गायकवाड | Published: August 23, 2022 05:25 PM2022-08-23T17:25:32+5:302022-08-23T17:27:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत
लातूर : शहरामध्ये अनेक विद्यार्थी वसतिगृह, रुम करून शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी बाहेरगावची लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी खानावळ (मेस) लावून आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
मेसचे दर कमी करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दयानंद गेटपासून घोषणा देत विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय गाठले आणि मेस चालकांना दर कमी करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. लातूर शहरामध्ये दोन ते अडीच हजार रुपये दरमहा खानावळ (मेस) ला पैसे मोजावे लागतात. अकरावी, बारावी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेस शिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र महागाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून मेस चालकांनी दर वाढविले आहेत.
स्पर्धा परीक्षा, खाजगी शिकवणी वर्ग तसेच अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचा लोंढा मोठ्या प्रमाणात लातूर शहरात आहे. बहुतांश विद्यार्थी शेतकरी, गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. मात्र मेस चालकांनी दर वाढविले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मंगळवारी एकत्र येऊन दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच तहसीलदारांना निवेदन देले.