लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:09 PM2018-07-06T12:09:14+5:302018-07-06T12:10:50+5:30

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

The food poisoning case in Latur district: the health of six students decreased | लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

Next

लातूर : जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली़

मंगरुळ येथील जिल्हा परिषद शाळेतील १४१ विद्यार्थ्यांना बुधवारी खिचडीतून विषबाधा झाली होती़ या विद्यार्थ्यांना वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते़ त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होती़ बुधवारी त्यातील चौघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर पुजा बालाजी भाले, सय्यद मोहम्मद वहाब, अफ्रोज बशिर सय्यद, अन्वर मुस्तफा पटेल, साबेर खादर पठाण, सोनी खादर पठाण या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी मंगरुळ येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन चौकशी केली़ तसेच अन्नधान्य, स्वच्छतेची पाहणी केली़ यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच यांची बैठक घेऊन सूचना केल्या़ पुन्हा अशी घटना घडल्यास निलंबनाची कार्यवाही करुन गुन्हे दाखल केले जातील, असेही ते म्हणाले़ त्यानंतर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन चौकशी केली़ तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले़

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर पटणे, तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, गटविकास अधिकारी जे.डी. गौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, मंडळ अधिकारी व्ही.एन. नागलगावे, सरपंच महेताब बेग, पाशा पटेल, अजम पटेल, विस्तार अधिकारी उत्तम केंद्रे, उपसरपंच संगम आष्टूरे, लक्ष्मीकांत मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे यांची उपस्थिती होती़
 

Web Title: The food poisoning case in Latur district: the health of six students decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.