महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:23 PM2023-01-14T12:23:26+5:302023-01-14T12:26:35+5:30

कर्मचारी म्हणाले होते, डिमांड रक्कम भरली म्हणजे तुमचा महावितरणशी आता कुठे साखरपुडा झाला. ज्यावेळी जोडणी मिळेल त्यावेळी लग्न झाले म्हणून समजा.

for electricity connection At the door of Mahavitran in Nilanga, the groom arrived on horseback! | महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन

महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन

Next

निलंगा (जि. लातूर) : वीज जोडणीसाठी डिमांड भरून तीन वर्ष उलटली तरी अद्याप जोडणी का देण्यात आली नाही? अशी विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेल्या संतप्त शेतकऱ्यांना तुम्ही विद्युत कलेक्शनचे डिमांड भरले म्हणजे ‘तुमची महावितरणशी आता सोयरीक झाली. जेव्हा वीजजोडणी होईल तेव्हा लग्न होईल अन् लग्न कधी होईल सांगता येत नाही’, असे बेजबाबदारपणे उत्तर महावितरणच्या उपअभियंत्याने दिले. याविरोधात शेतकऱ्यांनी नवरदेवाची वेशभूषा परिधान करून घोड्यावर बसून आमचे लग्न लावा म्हणून शुक्रवारी निलंग्यात आंदोलन केले.

मागील एक महिन्यापासून निलंगा विभागातील जवळपास २० गावात डीपीसाठी २०१८ मध्ये डिमांड भरूनही विद्युत जोडणी मिळत नसल्याने नागरिक महावितरणाला खेटे मारत होते. तरीही त्याची दखल कोणी घेत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी याबाबत सोमवारी लिंबन महाराज रेशमे यांच्याकडे व्यथा मांडली. तात्काळ रेशमे यांनी शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले. तेथे उपस्थित असलेले उपअभियंता शैलेश पाटील यांच्याशी विचारणा केली असता, ऑइल उपलब्ध नाही. रोहित्र दुरुस्तीला दिले आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

यावेळी शेतकऱ्यांनी साहेब, आम्ही विद्युत जोडणी डिमांड भरून तीन वर्ष उलटले आहे. तरीही अद्याप जोडणी मिळाली नाही. आम्ही शेतीला पाणी कसे द्यायचे, अशी विचारणा केली. त्यावर डिमांड भरली म्हणजे तुमचा महावितरणशी आता कुठे साखरपुडा झाला. ज्यावेळी जोडणी मिळेल त्यावेळी लग्न झाले म्हणून समजा. लग्न कधी हाेईल हे सांगता येत नाही, तुम्ही जिल्हा नियोजनमधून अथवा आमदार फंडातून निधी मंजूर करून आणा, असे बेजबाबदार उत्तर देत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. याबाबत ज्येष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेशमे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.

आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांचा सहभाग...
आंदोलनात शेतकरी रमेश बैनगिरे, संतोष हिरास, वाघंबर शिंदे, राम वाघमारे, व्यंकट नळेगावे यांनी डोक्यावर फेटा, मुंडावळ्या, गळ्यात हार घालून नवरदेवाची वेशभूषा परिधान करून घोड्यावर बसून ढोलताशांच्या गजरात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. हातात निषेधाचे बॅनर आणि महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करत माेर्चा कार्यालयावर धडकला. येथे शेतकऱ्यांनी शैलेश पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आंदोलनात व्यंकट पांचाळ, प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे, श्रीराम दडपे, प्रशांत माने, भगवान धुमाळ, लक्ष्मण शिंदे, धनराज मुळे, लायकपाशा शेख, सूर्यकांत गोबाडे, मारुती फलाटे, मनोज तांबाळे आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: for electricity connection At the door of Mahavitran in Nilanga, the groom arrived on horseback!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.