महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन
By हरी मोकाशे | Published: April 10, 2024 08:33 PM2024-04-10T20:33:44+5:302024-04-10T20:33:57+5:30
गुणवत्ता वाढली : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासित कार्यक्रम
लातूर : राष्ट्रीय स्तरावर आणि शासनाच्या आरोग्य विभागात सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या एनकॉसचे मानांकन जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयास मिळाले आहे. विशेषत: राज्यातील पहिलाच बहुमान मुरुडने मिळविला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेेवर गुणवत्तेची मोहोर उमटली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा- सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचा गोरगरिब रुग्णांना लाभ होत आहे. जिल्ह्यात ११ ग्रामीण रुग्णालये असून त्यापैकी लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासित कार्यक्रमात सहभागी होऊन प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार मार्च महिन्यात रुग्णालयाची राजस्थान आणि छत्तीसगड येथील तज्ज्ञांच्या पथकाने तीन दिवस तपासणी केली होती. यात विविध १२ विभागांचे कार्य पाहिले होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता लागून होती. अखेर केंद्र शासनाने दर्जेदार गुणवत्तेचे मानांकन जाहीर केले आहे.
रुग्ण- नातेवाईकांकडून जाणून घेतली सेवा...
राष्ट्रीयस्तरावरील पथकाने ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभागातील सेवा, औषध वितरण, प्रसूतीगृह, अतिदक्षता, लसीकरण, शस्त्रक्रियागृह अशा विविध विभागांची पाहणी केली. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून आरोग्यसेवेसंदर्भातील प्रतिक्रिया घेतल्या होत्या.
यापूर्वीही केली होती तयारी...एनकॉसच्या मानांकनासाठी मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाने जवळपास ९ वर्षांपूर्वीही तयारी केली होती. तपासणीत गुण कमी मिळाल्याने मानांकनापासून वंचित रहावे लागले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रति खाटा १० हजार अनुदान...
मुरुड येथील ग्रामीण रुग्णालय हे ३० खाटांचे असून बाह्यरुग्ण विभागात दररोज जवळपास २६० रुग्णांची नोंदणी असते. या मानांकनामुळे रुग्णालयातील प्रत्येक खाटामागे १० हजार रुपयांचे वार्षिक अर्थसहाय्य होणार आहे. हे अनुदान तीन वर्षे मिळणार आहे. त्याचा सुविधा वाढविण्यासाठी उपयोग होणार आहे.
आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढली...
जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनबरोबर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आलेल्या प्रत्येक रुग्णांस विनाविलंब सेवा दिली. त्यामुळे हे यश मिळाले आहे. उर्वरित आरोग्य संस्थांनाही हे मानांकन मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. - डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक.
सर्वांच्या प्रयत्नामुळे यश...
राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळविण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याबरोबर तात्काळ आरोग्य सेवा- सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे हे यश मिळाले आहे. आणखीन गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करु.- डॉ. राजाभाऊ गलांडे, वैद्यकीय अधीक्षक, मुरुड.