राज्यात प्रथमच लातूरच्या आठ आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकनाची मोहोर
By हरी मोकाशे | Published: July 25, 2024 07:01 PM2024-07-25T19:01:41+5:302024-07-25T19:02:36+5:30
एनक्यूएएसकडून मूल्यांकन, पारितोषिकापोटी तीन वर्षांत ५१ लाख ८४ हजारांचा निधी
लातूर : राष्ट्रीय पातळीवर आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या एनक्यूएएसचे जिल्ह्यातील आठ आरोग्य उपकेंद्रांना मानांकन मिळाले आहे. पारितोषिकापोटी तीन वर्षांत या उपकेंद्रांना एकूण ५१ लाख ८४ हजार मिळणार आहेत. राज्यात प्रथमच लातूरच्या आरोग्य उपकेंद्रांनी राष्ट्रीय मानांकनावर आपले नाव कोरले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्याबरोबरच देश पातळीवर गुणवत्तापूर्ण सेवेतून आपला ठसा उमटविला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल क्वालिटी ॲशुरन्स स्टॅण्डर्ड्स मार्फत गत महिन्यात जिल्ह्यातील आठ आयुष्मान आरोग्य मंदिरे, आरोग्यवर्धिनी केंद्रांचे (उपकेंद्र) मूल्यमापन करण्यात आले हाेते. त्यात गर्भधारणा आणि बाळंतपणात घ्यावयाची काळजी, नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण आणि किशाेरवयीन आरोग्य सेवा, कुटुंबकल्याण, संसर्गजन्य रोग, साधे आजार, असंसर्गजन्य रोगाचे व्यवस्थापन, सामान्य नेत्ररोग आणि कान, नाक, घसा यासाठी काळजी, मुख आरोग्य काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा १२ सेवांचे मूल्यांकन झाले होते.
जिल्ह्यातील या उपकेंद्रांचा गौरव...
जिल्ह्यातील किनी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा (ता. उदगीर), पाखरसांगवी (ता. लातूर), काजळ हिप्परगा (ता. अहमदपूर), सारोळा (ता. औसा) आणि घोणसी (ता. जळकोट) या आठ आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे.
प्रत्येक उपकेंद्रास वर्षाला दोन लाख...
मानांकनप्राप्त एका उपकेंद्रास वार्षिक २ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. ८ उपकेंद्रांना एकूण वर्षाला १७ लाख २८ हजार उपलब्ध होणार आहेत. ही रक्कम तीन वर्षे मिळणार आहे. त्यामुळे एकूण ५१ लाख ८४ हजारांचे पारितोषिक आहे.
लोकाभिमुख सेवेचा गौरव...
जिल्ह्यात आरोग्य सेवांची व्याप्ती व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रास एनक्यूएएसचे मानांकन मिळाल्यामुळे सेवा आणखी लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच आरोग्य उपकेंद्रास मानांकन मिळणे हा जिल्ह्याचा गौरव आहे.
- वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी.
५० टक्के आरोग्य केंद्रांना मानांकन मिळविण्याचे ध्येय...
एनक्यूएएसचे मानांकन हे सर्वोच्च आहे. ते प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. मात्र, आरोग्य विभागाने सेवा-सुविधेच्या माध्यमातून मिळविले आहे. येत्या एक-दीड वर्षात ५० टक्के आरोग्य केंद्रांना मानांकन मिळविण्याचे आमचे ध्येय आहे.
- अनमोल सागर, सीईओ, जिल्हा परिषद.
आरोग्य सेवा आणखीन बळकट...
आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळणे हा मोठा अभिमान आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वांचे मनोबल वाढणार आहे. त्यातून आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
सहा महिन्यांत १८ आरोग्य संस्थांचा गौरव...
सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८ सार्वजनिक आरोग्य संस्थांचा एनक्यूएएस मानांकनाने गौरव झाला आहे. त्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, मुरुडचे ग्रामीण रुग्णालय, लातुरातील स्त्री रुग्णालय आणि आता आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचा समावेश आहे.