माजी उपमहापौर सुरेश पवार भाजपाच्या वाटेवर
By admin | Published: March 2, 2017 06:13 PM2017-03-02T18:13:49+5:302017-03-02T18:13:49+5:30
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व देशमुख गटाचे खंदे समर्थक माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडासमोर जबर झटका दिला
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 02 - काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व देशमुख गटाचे खंदे समर्थक माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडासमोर जबर झटका दिला आहे. त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गुरूवारी सकाळी १०़३० वाजता जिल्हाधिका-यांकडे राजीनामा देत थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी औरंगाबाद गाठले. औपचारिक बोलणीनंतर येत्या चार ते पाच दिवसात आपल्या कार्यकर्त्यासह लातुरात पक्षप्रवेशाचा ‘सोहळा’ करणार आहेत. पंधरा दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या अख्तर मिस्त्री यांनी काँग्रेसला पहिले खिंडार पाडताना सुरेश पवारांना भाजपात नेले आहे.
काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर सुरेश पवार गेल्या पाच टर्मपासून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मनपा अस्तित्वात आल्यानंतर पहिले उपमहापौर म्हणून त्यांची निवड होवून अडीच वर्षे ते पदावर होते. याशिवाय, उपनगराध्यक्ष एकदा व एकदा बांधकाम सभापती अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. ते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गुरूवारी सकाळी १०़३० वाजता माजी महापौर अख्तर शेख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जावून सुरेश पवार यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला. यानंतर औरंगाबादला रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मनपा आयुक्तांकडे राजीनामा दिल्यानंतर सुरेश पवार यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला असून, पवार यांच्या सोबत लातूर मनपातील काँग्रेस पक्षाचे अन्य कोणते नगरसेवक भाजपात जाणार आहेत, यासंदर्भात आता राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादेत भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मुलाच्या लग्नात भेट घेऊन लातुरात होणा-या पक्षप्रवेश सोहळ्याची तारीख निश्चित केली जाणार आहे.
अख्तर मिस्त्री यांचे काँग्रेसला पहिले खिंडार....
नुकत्याच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे मनावर घेतलेले दिसते़ कट्टर देशमुख समर्थक असलेल्या सुरेश पवार यांच्यावर त्यांनी पहिला यशस्वी गळ टाकला़ त्यांना भाजपात घेत आणखीही काही नगरसेवक भाजपाच्या वाट्यावर असून काँग्रेसला खिंडार पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा दावाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना केला.
जे लाहोटींना जमले नाही ते मिस्त्रींनी केले
विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेल्या शैलेश लाहोटी यांनी आता काँग्रेसमधून अनेकजण भाजपात येणार अशी घोषणा केली होती़ १६ नगरसेवक येणार असल्याचेही ते म्हणाले होते़ परंतु, प्रत्यक्षात एकालाही भाजपात घेऊन त्यांना पक्ष वाढविता आला नाही़ उलट महिनाभरात अख्तर मिस्त्रींनी महापालिकेच्या अनेक नगरसेवकांना भाजपात ओढण्यासाठी गळ टाकला आहे़ त्याला पहिले यश आज मिळाल्याचे बोलले जात आहे.