माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन; 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By हरी मोकाशे | Published: October 27, 2022 05:00 PM2022-10-27T17:00:13+5:302022-10-27T17:00:30+5:30
माजी राज्यमंत्री किशनराव देशमुख यांचे निधन झाले आहे.
अहमदपूर (लातूर) : माजी राज्यमंत्री भाई किशनराव नानासाहेब देशमुख (९५) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तालुक्यातील नांदुरा (खु.) या मूळ गावी दुपारी ४ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सूना, जावई, नातू असा परिवार आहे. भाई किशनराव देशमुख यांनी महाराष्ट्र विवेक वाहिनीचे अध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून कार्य केले होते. तसेच ते मराठवाडा विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संस्था चालक संघाचे संस्थापक अध्यक्ष, विचार विकास मंडळ संचलित महात्मा महाविद्यालय अहमदपूरचे संस्थापक सरचिटणीस अशा विविध पदावर काम केले आहे.
मराठवाड्यात रजाकरांचा अन्याय मोडून काढण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी दोनदा तुरुंगवासही भोगला होता. शेतीमालास योग्य भाव मिळावा व एकाधिकार खरेदीद्वारे सरकारने ट्रेडिंग कार्पोरेशनमार्फत खरेदी करावी यासाठी चळवळी केल्या होत्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून त्यांनी मोर्चेही काढले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"