माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार
By राजकुमार जोंधळे | Published: June 15, 2024 09:20 PM2024-06-15T21:20:44+5:302024-06-15T21:21:11+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले उच्च विद्याविभूषित, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले माजी आमदार त्र्यंबक पांडुरंग कांबळे यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले.
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : हेर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करून शिरूर अनंतपाळचे नाव राज्याच्या नकाशावर ठळकपणे उमटविणारे माजी आमदार टी.पी. कांबळे (वय ८२) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी लक्कड जवळगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले उच्च विद्याविभूषित, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले माजी आमदार त्र्यंबक पांडुरंग कांबळे यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. माजी आमदार टी.पी. कांबळे दोन वेळा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हेर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले हाेते. १९७६ ते ७८ या अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अपक्ष म्हणून घोडा चिन्ह घेत निवडणूक लढविली हाेती. यावेळी त्यांनी दिग्गज उमेदवाराचा पराभव केला हाेता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून हेर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळवून विक्रमी मताने निवडणूक जिंकली होती. त्यामुळे २००५ ते २००९ या काळात त्यांनी आमदार म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या सौहार्दाच्या संबंधामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यासह हेर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांचा विकास केला. विधानसभेत आपल्या कामाची छाप पाडली. त्याचबरोबर राज्याच्या नकाशावर शिरूर अनंतपाळचे नाव कोरले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सामन्य कुटुंबात जन्म...
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४५ साली लक्कड जवळगा येथे माजी आमदार टी.पी. कांबळे यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळविली. काही वर्ष त्यांनी एसटी महामंडळात नाेकरी केली. मात्र, सामाजिक कार्याची आवड असल्याने ते १९७६ साली अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव करून ते विजयी झाले.