व्हॉलीबॉलला पुन: सोनेरी दिवस आणण्यासाठी माजी खेळाडू मैदानात ! व्हीडीएफआयची राज्यात चळवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:31 PM2022-05-09T17:31:56+5:302022-05-09T17:32:24+5:30
राज्यात व्हॉलीबॉल खेळाच्या दोन संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना नेहमीच पेच आहे.
- महेश पाळणे
लातूर : व्हॉलीबॉल क्षेत्रात आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच व्हॉलीबॉलला पुन: सोनेरी दिवस आणण्यासाठी माजी खेळाडू मैदानात उतरले असून, व्हॉलीबॉलच्या विकासासाठी त्यांनी चंग बांधला असून, व्हॉलीबॉल डेव्हलपमेंट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी विकासाची चळवळ सुरू केली आहे.
राज्यात व्हॉलीबॉल खेळाच्या दोन संघटना असून, गेल्या अनेक दिवसांपासून त्यात वाढ आहे. त्यामुळे खेळाडूंची गोची होत आहे. मात्र, याचे देणेघेणे ना संघटनेला ना कोणाला, ही बाब लक्षात घेऊन व राजकारणविरहित व्हॉलीबॉल डेव्हलपमेंटसाठी माजी खेळाडू एकत्र आले असून, त्यांनी पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक मार्गदर्शकांचे कोल्हापूर जिल्ह्यातील बाचणी येथे प्रशिक्षण शिबिर घेतले. यात राज्यातील ८२ प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक एस. कुमारा व पी. सी . पांडियन यांनी या प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या टप्प्यात राज्य शासनाच्या क्रीडा विभागाला प्रस्ताव देत राज्यातील खेळाडूंसाठी पुण्याच्या बालेवाडी येथे प्रशिक्षण शिबिर ठेवले असून, हे शिबिर सध्या पुण्यात सुरू आहे. माजी खेळाडू तथा प्राप्तीकर आयुक्त विपुल वाघमारे यांच्या पुढाकारातून ही संकल्पना राबविण्यात आली असून, राज्यात व्हॉलीबॉल विकासासाठी या माध्यमातून माजी खेळाडू प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे व्हॉलीबॉलला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा व्हॉलीबॉल प्रेमींची आहे.
सहा फुटांच्या ३५ खेळाडूंना प्रशिक्षण
पुण्यातील बालेवाडी येथे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील किमान ६ फूट उंच असलेल्या निकषावर ३५ खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर सध्या पुण्यातील बालेवाडी येथे सुरू आहे. भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक पी. सी. पांडियन (तामिळनाडू) हे दिवसभरात तीन सत्रांत खेळाडूंना कौशल्यासह विशेष ड्रील्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत.
खेलो इंडियासाठी उभारणी...
राज्याचा संघ दर्जेदार व्हावा व या संघाची भक्कम उभारणी होऊन खेलो इंडिया स्पर्धेस पदक मिळवावे, अशी अपेक्षा ठेवून दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने हे शिबिर सुरू आहे. शिबिरात खेळाडूंची निवास, भोजन व सर्व व्यवस्था राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने केली आहे. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बखोरिया यांनीही या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दोन संघटनांचा वाद केव्हा मिटणार..?
राज्यात व्हॉलीबॉल खेळाच्या दोन संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना नेहमीच पेच आहे. इकडे आड, तिकडे विहीर असल्याने व्हॉलीबॉल खेळाचा फुटबॉल झाला आहे. व्हीडीएफआयच्या माध्यमातून भविष्यात आणखीन कौशल्य प्रशिक्षण, आहार, स्पर्धा, पंच प्रशिक्षण आदी बाबी घेतल्या जाणार आहेत.